मुंबई – ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या अवताराचा संसर्ग भारतात हळूहळू वाढू लागला आहे. देशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत दाखल होत असल्याने ओमिक्रॉनचा सर्वाधित धोका मुंबईला आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबईत तपासणीसह कठोर उपाययोजना राबविल्या जात आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून मुंबईला परतलेला २९ वर्षांचा युवक ओमिक्रॉनबाधित आढळला आहे. परंतु त्या युवकामध्ये कोणतेही लक्षणे नाहीत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली.
महापालिकेने सांगितले, की या व्यक्तीने फायझर लशीच्या तीन मात्रा घेतल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात विमानतळावर तपासणीदरम्यान कोरोनाबाधित आढळला होता. त्यानंतर त्याचे नमुने जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचेही परीक्षण करण्यात आले, त्यामध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सतर्कता म्हणून बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यामध्ये अद्याप कोणतेही लक्षण दिसले नाही.
राज्यात ४० रुग्ण
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ओमिक्रॉनबाधितांची संख्या १५ झाली आहे. त्यापैकी ५ रुग्ण मुंबईच्या बाहेरील आहेत. परंतु त्यापैकी १३ रुग्णांना रुग्णालयातून यापूर्वीच घरी पाठविण्यात आले आहे. ओमिक्रॉनबाधितांमध्ये अद्याप कोणतेही गंभीर लक्षण आढळले नाही. राज्यात ओमिक्रॉनबाधितांची संख्या ४० झाली आहे.
मुंबईत कठोर निर्बंध
मुंबईत १६ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मुंबई पोलिस म्हणाले, की कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनेअंतर्गत नाताळ आणि नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित होणार्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठे कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.