विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतात सोमवारी म्हणजेच सलग चौदाव्या दिवशी दैनिक संक्रमण दर पाच टक्क्यांपेक्षा कमी नोंदविण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार खरे तर आता अख्खा देश अनलॉक होण्यास काहीच हरकत नाही, मात्र तरीही वैद्यकीय तज्ज्ञ अनलॉकचा सल्ला देताना काळजी घेत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटे विरुद्धचा लढा पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र आणि आव्हानात्मक आहे. रुग्णसंख्या रोखणे आणि त्याचवेळी लसीकरणाचा वेग वाढविणे अश्या दोन्ही पातळ्यांवर प्रशासनाला काम करावे लागत आहे. मात्र आता भारताने दुसऱ्या लाटेवर बऱ्यापैकी मात केली आहे. अनेक राज्य तर या संकटातून आता पूर्णपणे बाहेर पडले आहे. अश्यात गेल्या चौदा दिवसांपासून भारतात दैनिक संक्रमण दर सलग ५ टक्क्यांपेक्षाही कमी येत आहे, ही दिलासादायक बाब आहे.
दैनिक संक्रमण दर
भारतात दैनिक संक्रमण दर सोमवारी ३.८३ टक्के नोंदविण्यात आला. ७ जूनला हाच दर ४.६ टक्के होता. त्यानंतर आजपर्यंत ५ टक्क्यांपेक्षा कमीच दर नोंदविण्यात येत आहे. ही सकारात्मक बाब असली तरीही सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूचे नवे व्हेरियंट पुढे येत आहेत. शिवाय दररोज ५० हजारांपेक्षा अधिक लोक संक्रमितही होत आहेत.
तज्ज्ञ काय म्हणतात?
डेल्टा प्लससारखे नवे व्हेरियंट पुढे येत असल्याने दुसऱ्या लाटेच्या ओसरण्यावर आनंदी होण्याची आवश्यकता नाही. जेवढ्या वेगाने दुसरी लाट वर आली, तेवढ्याच वेगावे खाली उतरत आहे. पण तरीही गाफील राहून चालणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
डब्ल्यूएचओ काय म्हणते?
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आधीच स्पष्ट केले आहे की ज्या देशांमध्ये दैनिक संक्रमण दर सलग १४ दिवस ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल त्या देशांमधील सर्व निर्बंध हटविले जाऊ शकतात. या निकषांनुसार भारतातील सर्व निर्बंध हटविले जाऊ शकतात. मात्र काही राज्यांमधील निर्बंधांमध्ये शिथिलता येताच नागरिकांनी सार्वजनिक स्थळांवर वाढविलेली गर्दी चिंतेची बाब ठरत आहे.