इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अणूयुद्धाच्या दिशेने जात असल्याचे संकेत देत आहेत, असा दावा ब्रिटनमधील अनेक माध्यमांनी टेलिग्राम वृत्तवाहिनीच्या हवाल्याने केला आहे. पुतिन यांनी आपल्या सैन्याला न्यूक्लियर वॉर ड्रिल म्हणजेच अणूयुद्धाचा अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या दाव्याला बळ मिळाले आहे. पुतिन यांनी आपल्या कुटुंबीयांना सुरक्षेच्या कारणाने सायबेरिया येथे पाठविले आहे. तर आण्विक युद्धाच्या तयारीच्या वृत्तामुळे क्रेमलिन (रशियाचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय) मधील अधिकारी चांगलेच हादरले आहेत.
आण्विक युद्धाचे परिणाम किती भयानक असू शकतात, या विचारानेच अधिकारी धास्तावले आहेत. विश्लेषक सांगतात, की युद्धाच्या २५ दिवसांनंतरही युक्रेनने अद्याप शस्त्रे टाकली नाहीत. त्यामुळे पुतिन खूपच नाराज झाले आहेत. आता त्यांनी याला आव्हानच मानले आहे. एक लहान देश त्यांना आव्हान देत आहे असा विचार पुतिन करत आहेत. पुतिन आण्विक युद्धाच्या अभ्यासात सहभाग घेणार असल्याच्या सूचना त्यांनी स्वतः क्रेमलिनमधील वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
व्लादिमीर पुतिन यांच्या कुटुंबीयांबाबत अद्याप जास्त माहिती हाती आली नसली तरी, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सायबेरियाच्या तेह अल्ताई पर्वतरांगेतील एका उच्चतंत्रयुक्त भूमिगत ठिकाणी स्थानांतरित केले आहे, असा दावा वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. या ठिकाणी एक अख्खे भूमिगत शहरच वसलेले आहे असे बोलले जात आहे.
पुतिन यांनी एक धोकादायक योजना आखली आहे. ती आता गुप्त राहिलेली नाही. आण्विक संघर्षासाठी रशियाकडे डुम्सडे विमान आहेत. पुतिन आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडून या विमानांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. एका हवाई बंकरचेसुद्धा डुम्सडे योजनेअंतर्गत नियोजन करण्यात आले आहे, परंतु ते अद्याप तयार झाले नाही.
पाश्चिमात्य देशांच्या काही गुप्तचर संस्था सध्याच्या परिस्थितीनुसार पुतिन यांच्या डोक्यात सध्या काय सुरू आहे, याबद्दल विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुतिन स्वतःच्या एका वेगळ्याच जगात फसले आहेत. तिथे ते एकटेच निर्णय घेतात. इतर दृष्टिकोनातून हे खूपच वेगळे आहे, असे त्यांच्या विश्लेषणात सांगण्यात आले आहे.