विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूविरोधात लस घेतल्यानंतर आपण सुरक्षित राहू शकतो, हे अनेक अभ्यासांती सिद्ध झालेले आहे. अपोलो रुग्णालयाने अशाच प्रकारे संशोधन केले होते. त्याचे निष्कर्ष बुधवारी (१६ जून) जाहीर करण्यात आले आहेत. देशातील आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांवर केलेल्या संशोधनात सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
लस घेतलेल्या ३१,६०० आरोग्य कर्मचार्यांवर झालेल्या संशोधनात ९५ टक्क्यांहून अधिक आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाला नसल्याचे आढळले आहे. फक्त ४.२८ टक्के कर्मचारी बाधित झाले आहेत. देशातील विविध आरोग्य केंद्रांवर काम करणार्या कर्मचार्यांवर १६ जानेवारी ते ३० मेदरम्यान हे संशोधन झाले आहे.
संशोधन झालेल्या कर्मचार्यांनी लशीचे दोन डोस किंवा कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनपैकी एकाचा एक डोस घेतले होता. अपोलो रुग्णालय समुहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी सांगतात, कोरोना विषाणूविरोधात व्यापक लसीकरण खूपच महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट झालेले आहे. लस सुरक्षित आहेच शिवाय संसर्गाची गंभीरता कमी करते आणि लोकांचे आयुष्य वाचवते.
भाजपचा आरोप
काँग्रेसचे राष्ट्रीय इंटरनेट मीडियी समन्वयक गौरव पांढी यांनी केलेल्या ट्विटवर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी निशाणा साधला आहे. कोरोना लशीबाबत संशय पसरविण्याबद्दल विरोधी पक्षाला ओळखले जाईल. काँग्रेस स्वदेशी लशीबाबत संभ्रम निर्माण करत आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यानी लस घेतली आहे की नाही, त्यांना लशीवर विश्वास आहे की नाही, हे एकदा सांगावे. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भाजप सरकारने लोकांचा विश्वासघात करू नये. जर कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराचे अंश टाकले असतील तर लोकांना हे जाणून घेण्याचा हक्क आहे, असा प्रश्न गौरव पांढी यांनी एक माहिती अधिकाराच्या अहवालाचा दाखला देत प्रश्न विचारला होता.