नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या येवला तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानच्या मुस्लिम धर्मगुरुची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या आरोपाखाली गुरुवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, इतर आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यापैकी एक पथक लवकरच उत्तर प्रदेशला जाणार आहे.
३५ वर्षीय जरीफ बाबा हे बॉलीवूडचे अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आमिर खान या तिन्ही खानच्या नावाचा वापर करून करोडोंची कमाई करत होते. शाहरुख, सलमान आणि आमिर खान हे माझे सल्ले ऐकूनच एवढे मोठे झाले आहेत, माझ्या सल्ल्यांमुळेच त्यांनी एवढे मोठे यश गाठले आहे, असे सांगण्याचा ते प्रयत्न करायचे. तसे व्हिडिओदेखील ते बनवायचे आणि या व्हीडिओंच्या मदतीनेच या अफगान बाबांचे फॉलोअर्स आणि कमाई झपाट्याने वाढली होती. यानंतर ते इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) रडारवर आले होते.
वावी पोलिसांनी २२ एप्रिल २०२१ रोजी इंटेलिजन्स ब्युरोला २०२१ मध्ये जरीफ बाबा, त्यांची पत्नी आणि ड्रायव्हर गफ्फार यांची चौकशी केल्यानंतर अहवाल सादर केला होता. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफी झरीफ बाबांच्या हत्येत त्याच्या ड्रायव्हरशिवाय त्याच्या अटेंडंटचाही सहभाग होता. त्याने अन्य दोघांसह हा गुन्हा केला आणि बाबाची एसयूव्ही कार (एमएच ४३ बीयू ७८८६), दोन मोबाईल घेऊन फरार झाला.
सलमान, शाहरुख आणि आमिर खान यांची नावे आणि फोटो वापरुन व्हीडिओ बनवल्यामुळे जरीफ बाबाच्या फॉलोअर्सची संख्या अवघ्या काही काळातच लाखोंमध्ये पोहोचली होती. बाबाच्या यूट्यूब चॅनलवर २ लाख २७ हजार, फेसबुकवर ५ लाख आणि इंस्टाग्रामवर १७.५ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. त्यांच्या चाहत्यांची संख्या सातत्याने वाढत होती. यूट्यूबवर तर त्यांच्या व्हिडिओला ६० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज होते. तीन यूट्यूब चॅनेल्स त्यांचे आहेत. कमाईचे हे चॅनेल्सही सर्वात मोठे साधन मानले जाते.
झरीफ बाबाचे दिसणे, बोलण्याची शैली, वागण्याची पद्धत, राहणीमान यामुळे सामान्य लोकांना त्यांच्याविषयी आकर्षण वाटत. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच ते झपाट्याने ते प्रसिद्ध होत होते. बोलण्याबरोबरच काही व्हिडिओंमध्ये ते सूफी पोशाखात नाचताना दिसतात. झाडूच्या साहाय्याने आशिर्वाद देऊन महिला, लहान मुले आणि वृद्धांना बरे करण्याचा दावाही करत. त्यामुळेच त्यांना भेटण्यासाठी देशभरातून लोक येत असत.
बाबांना त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच काही धार्मिक संस्थांकडून मोठी रक्कम मिळत होती. त्यामुळेच त्यांच्या संपत्तीत गेल्या चार वर्षांत प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे त्याचे अनेक शत्रू झाले होते. बहुतांश मालमत्ता बाबाच्या जवळच्या मित्रांच्या नावावर खरेदी करण्यात आल्या होत्या, असे तपासात समोर आले. याविषयी बोलताना एसपी सचिन पाटील यांनी सांगितले की, सूफी बाबा निर्वासित असल्याने त्यांना येथे मालमत्ता खरेदी करता आली नाही. त्याचे बँकेत खाते नव्हते. त्यामुळे बाबाने आपल्या एका जवळच्या मित्राच्या नावाने बँक खाते उघडले.
तसेच दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने SUV 500 ही गाडी खरेदी केली होती. त्यामुळे बाबांच्या एकूण मालमत्तेचा मागोवा घेण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या त्यांच्याकडे चार कोटींची संपत्ती होती. काही दिवसांपूर्वी बाबांनी येवल्यात १५ एकर जमीन खरेदी केली होती. येवल्यातच कायमस्वरुपी राहण्याचा त्यांचा विचार होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मौल्यवान दगड विक्रीचा व्यवसायही सुरू केला होता.
झरीफ बाबा गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून वावी ठाणे क्षेत्रातील मीरगाव शिवारात असलेल्या एका बंगल्यात राहत होते. त्यांनी अर्जेंटिना वंशाच्या २८ वर्षीय तिरिना दाऊदीशी लग्न केले होते. पोलिसांना अद्याप त्यांच्याकडून कोणतेही मॅरेज सर्टिफिकेट मिळू शकलेले नाही. महिलेला हिंदी, इंग्रजी किंवा मराठी येत नसल्याने तिची चौकशी करण्यात अडथळे येत आहेत. तिच्याकडे २०२३ पर्यंत भारतात राहण्याचा व्हिजा आहे. या घटनेमुळे नाशिक पोलिसांनी महिलेच्या सुरक्षेत वाढ केली आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.
Afghanistan Sufi Cleric Bollywood connection investigation police Murder