येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूचा खून त्यांच्या ड्रायव्हरने केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. प्रॉपर्टी आणि पैशावरून अहमद चिस्ती यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.या हत्येबाबत इतरही काही कारण आहे का, याबाबत पोलीस तपास सुरू असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुफी धर्मगुरु यांचा ड्राइव्हर आणि इतर तीन जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांचे पथक या फरार संशयितांचा शोध घेत आहेत.
चिंचोली एमआयडीसी परिसरात काल सायंकाळी अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हा धर्मगुरू मूळचा अफगाणिस्तान येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती असे या अफगाणी सुफी धर्मगुरूचे नाव असून, त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सुफी धर्मगुरूच्या हत्या झाल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. हा खून धार्मिक तेढमधून झाल्याचे बोलले जात होते. पण, पोलिसांनी केलेल्या तपासात हा खून प्रॉपर्टी आणि पैशावरून झाल्याचे समोर आले आहे.
Afghani sufi cleric murder Nashik rural sp press conference