काबूल (अफगाणिस्तान) – ईराणच्याच धर्तीवर नवे सरकार स्थापन करण्याच्या घोषणेसाठी तालिबान पूर्णपणे सज्ज आहे. जुम्म्याची नमाज अदा केल्यानंतर तालिबानचे सरकार स्थापन करण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते, असे तालिबानी नेत्यांनी सांगितले. तालिबानचा सर्वात मोठा धार्मिक नेता मुल्ला हेबतुल्ला अखुंदजादा याला देशाचा सर्वोच्च नेता निवडण्यात आले आहे. सरकार स्थापनेबाबत पूर्ण चर्चा झाली असून, सरकारच्या आराखड्यावर मोहोर लावण्यात आली आहे.
अखुंदजादा सर्वोच्च नेता
तालिबानचा ६० वर्षीय नेता मुल्ला अखुंदजादा तालिबान सरकारचा सर्वोच्च नेता असेल. वरिष्ठ नेता अहमदुल्लाह मुत्तकी सोशल मीडियावर म्हणाला, राष्ट्रपती भवनमध्ये एका समारंभाची तयारी सुरू आहे. अखुंंदजादा सर्वात मोठा राजकीय आणि धार्मित प्राधिकारी असेल. त्याचे पद राष्ट्रपतीच्याही वरचे असेल. सरकार आणि न्याय व्यवस्थेच्या प्रमुखांची नियुक्त तो करेल. देशातील राजकीय, धार्मिक तसेच सैनिकांबाबतचा त्याचा निर्णय अंतिम असेल.
काय आहे ईराण मॉडेल
ईराणमधीळ नेतृत्वाच्या धर्तीवर अफगाणिस्तानची व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. ईराणमध्ये सर्वात मोठा राजकीय आणि धार्मिक प्राधिकारी असतो. त्याचे पद राष्ट्रपतिपदाच्याही वरचे असते. तो लष्कर, सरकार आणि न्याय व्यवस्थेच्या प्रमुखांची नियुक्ती करतो. या विभागांशी संबंधित त्याचाच निर्णय अंतिम असतो.
गव्हर्नर प्रांताचे प्रमुख
तालाबानी नेता समांगनीच्या माहितीनुसार, मुल्ला अखुंदजादा सरकारचा सर्वोच्च नेता असेल. राष्ट्रपती त्याच्या आधीन राहून काम करतील. मुल्ला अखुंदजादा तालिबानचा सर्वात मोठा धार्मिक नेता असून गेल्या १५ वर्षांपासून तो बलुचिस्तान प्रांतातील कचलाक परिसरात एका मशिदीत कार्यरत आहे. नव्या सरकारमध्ये गव्हर्नर प्रांतांचे प्रमुख असतील. जिल्हा गव्हर्नर आपल्या जिल्ह्याचा प्रभारी असेल.
महिलांचा समावेश
तालिबानने आधीच प्रांत आणि जिल्ह्यांच्या गव्हर्नर, पोलिस प्रमुख आणि पोलिस कमांडरची नियुक्ती केली आहे. नव्या प्रशासन प्रणालीचे नाव, झेंडा, राष्ट्रगीतवर अद्याप निर्णय झालेला नाही. नव्या सरकारमध्ये कबिल्याचे सदस्य आणि महिलांना समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती दोहामधील तालिबानच्या कार्यालयामधील उपनेता शेर मोहम्मद अब्बास स्कानिकजई याने परदेशी माध्यमांना दिली.