काबुल – अफगाणिस्तानमधून पलायन केलेले राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी बुधवारी रात्री पहिल्यांदाच जगासमोर आले आणि त्यांनी देश सोडल्याचे कारण स्पष्ट केले. देश सोडल्याच्या चौथ्या दिवशी त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून कारणमिमांसा केली. अफगाणिस्तान सोडले नसते तर रक्तपात झाला असता. मी अफगाणिस्तानला असे पाहू शकत नाही. त्यामुळेच मला एक पाऊल मागे घ्यावे लागले, असे सांगत त्यांनी पैसे घेऊन पलायन केल्याच्या वृत्ताचे खंडन केले.
आरोप फेटाळले
पैसे घेऊन पलायन केल्याच्या आरोपावर गनी म्हणाले, या आरोपांना कोणताच आधार नाही. मी देशाचे पैसे घेऊन आलो नाही. शांततेच्या मार्गाने सत्ता हस्तांतरित करण्याची माझी इच्छा होती. अफगाणिस्तान सोडून मी माझ्या देशाच्या नागरिकांना रक्तपातापासून वाचविले आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे मी अफगाणिस्तानपासून दूर आहे. सुरक्षा अधिकार्यांच्या सल्ल्यानंतर मी हे पाऊल उचलले. आम्ही तालिबानशी चर्चा करत होतो. परंतु ती निष्फळ ठरली.
म्हणून देश सोडला…
एएफपी वृत्तसंस्थेनुसार, अश्रफ गनी अफगाणिस्तानात परतण्यासाठी चर्चा करत आहेत. जनतेला संबोधित करताना ते म्हणाले, माझ्या इच्छेविरुद्ध देशातून जावे लागले. मला पळपुटा म्हणणार्यांना काहीच माहिती नाही. सुरक्षेच्या कारणांमुळे मला माघारी जावे लागले. मी तिथेच राहिलो असतो तर मोठ्या प्रमाणात हिंसाचार होऊन रक्तपात झाला असता. दुर्दैवी घटना होऊ नये हाच माझ्या जाण्याचा उद्देश होता. त्यामुळे मला जे ओळखत नाहीत, त्यांनी बोलू नये.
माणुसकीच्या आधारावर परवानगी
संयुक्त अरब अमिरातच्या (यूएई) म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यूएईमध्ये आहेत. गनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना माणुसकीच्या आधारावर यूएईमध्ये आश्रय दिला आहे. यूएईच्या सरकारी माध्यम समितीने ही माहिती दिली. गनी नेमके कोणत्या ठिकाणी आहेत, याबाबत स्पष्ट करण्यात आले नाही. काबुल न्यूजच्या ट्विटमध्ये गनी हे यूएईची राजधानी अबुधाबी येथे स्थायिक झाले आहेत, असा दावा केला आहे.