वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधून अमेरिकी आणि नाटो सैनिकांनी आता पूर्णपणे माघार घेतली आहे. अशाप्रकारे १९ वर्षे दहा महिने आणि २५ दिवसांनंतर म्हणजेच जवळपास २० वर्षांनंतर अफगाणिस्तानवर तालिबानने पुन्हा ताबा मिळविला आहे. अमेरिकेचे सैनिक माघारी परतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ही मोहीम यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. परंतु अमेरिकेला पश्चाताप झाल्याची भावाना त्यांच्या बोलण्यातून जाणवली. कारण अमेरिकेचा दहशतवादाविरोधात लढा कायम राहणार आहे. पण कोणत्याही देशात सैनिकांचे तळ निर्माण करणार नाही, असे ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.
निर्णय योग्यच
अमेरिकेचे सैनिक पूर्णपणे माघारी परतल्यानंतर ज्यो बायडेन यांनी बुधवारी देशाला संबोधित केले. ते म्हणाले, अफगाणिस्तानातील मोहीम यशस्वी झाली आहे. देशासह जगभरात दहशतवादविरोधातील आमचा लढा कायम राहणार आहे. परंतु कोणत्याच देशात लष्कराचे तळ निर्माण करणार नाही. अफगाणिस्तानातून सैनिक माघारी बोलावण्याचा निर्णय योग्य आणि उत्तम आहे. अफगाणिस्तानातील युद्ध संपले आहे. युद्धाला पूर्णविराम कसा द्यावा, या प्रश्नांना सामोरे जाणारा मी अमेरिकेचा चौथा राष्ट्राध्यक्ष आहे. मी हे युद्ध समाप्त करणार असल्याचे आश्वासन लोकांना दिले होते. ते पूर्ण झाले आहे.
अमेरिकेने काय गमावले
अफगाणिस्तानात अमेरिकेचे खर्व डॉलर रुपये खर्च केले आहेत. तसेच हजारो अमेरिकी सैनिकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे हे विधान महत्त्वाचे आहे. अफगाणिस्तानात मृत्यू झालेल्या अमेरिकी सेवा सदस्यांची संख्या २४६१ झाली आहे. एप्रिलपर्यंत ३८४६ अमेरिकी ठेकेदारांचा मृत्यू झाला आहे. नाटो आणि इतर देशांच्या इतर सेवांच्या ११४४ सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या वीस वर्षांदरम्यान ४७,२४५ अफगाण नागरिक मारले गेले आहेत.
युद्धमोहीम नव्हे दयामोहीम
ज्यो बायडेन म्हणाले, आमच्या सैनिकांनी दुसर्यांची सेवा करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले आहे. ही युद्धाची मोहीम नव्हे, तर दया मोहीम होती. अमेरिकेने जे काही करून दाखविले ते इतिहासात कोणीही करून दाखविले नाही. अमेरिकी सैनिकांना माघारी बोलावण्याचा निर्णय रात्रीतून घेण्यात आलेला नव्हता. यासाठी मोठी प्रक्रिया राबवावी लागली. अमेरिकी लोकांसह लष्कराशी संबंधित लोकांची याबाबत सल्लामसलत करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.