नवी दिल्ली – अफगाणिस्तानात दहशतवाद्यांची घुसखोरी आणि तालिबानला शांततेच्या चर्चेत सहभागी होण्यास प्रवृत्त करण्यास अपयशी ठरल्याबद्दल अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी पाकिस्तानावर टीका केली आहे. ताश्कंद येथे सुरू असलेल्या एका संमेलनात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि इतर अनेक देशांच्या नेत्यांच्या आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांनी पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका केली. पाकिस्तानने तालिबानच्या मदतीसाठी १० हजारांहून अधिक जेहादी दहशतवादी अफगाणिस्तानात पाठविल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
पाकिस्तानचे अपयश
मध्य आणि दक्षिण आशिया ः क्षेत्रिय संपर्क, आव्हाने या विषयावरील संमेलनात राष्ट्रपती गनी सांगतात, गोपनीय माहितीच्या अंदाजानुसार, गेल्या महिन्यात पाकिस्तान आणि इतर ठिकाणांवरून १० हजारांहून अधिक जिहादी दहशतवादी अफगाणिस्तानात दाखल झाले आहेत. तालिबानला शांतता चर्चेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यासह सीमेपलीकडून दहशतवादी कृत्यांना रोखण्याचे आश्वासन पूर्ण करण्यास पाकिस्तान अपयशी ठरला आहे.
पाकिस्तानची पोलखोल
गनी म्हणाले, तालिबान गेल्या काही आठवड्यापासून अफगाणिस्तानात वेगाने आगेकूच करत आहे. देशातील मोठ्या भूभागावर त्यांनी कब्जा केला आहे. अमेरिकेने आपले बहुतांश सुरक्षारक्षक मागे घेतले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत त्यांनी उर्वरित सुरक्षारक्षक मागे घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येणे पाकिस्तानाच्या हितासाठी योग्य नाही. असे सांगत पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या लष्करी अधिकार्यांनी अनेकदा आश्वासने दिली. परंतु अफगाण लोकांच्या तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्यानंतर तालिबानचे समर्थक आणि समर्थित संघटना खुलआम जल्लोष करत आहेत.
इम्रान खानचे स्पष्टीकरण
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी पाकिस्तानची पोलखोल केल्याची बाब पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चांगलीच झोंबली. अफगाणिस्तानच्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसला आहे, असे सांगत इम्रान खान यांनी गनी यांचे आरोप फेटाळून लावले.
गेल्या १५ वर्षांपासून पाकिस्तानाच्या भागातील ७० हजारांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानला आता अधिक संघर्ष नकोय. अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानातून माघारी गेल्यानंतर तालिबान चर्चेसाठी इच्छुक नव्हता. नाटोचे दीड लाख सैनिक अफागाणिस्तानात असताना तालिबानला चर्चेचे स्वारस्य होते. अमेरिकेचे सैनिक माघारी परतल्यानंतर तालिबान चर्चा का करेल? चर्चेस तयार करण्यासाठी पाकिस्तानने तालिबानविरोधात मोहीम राबविली. इतर कोणत्याही देशाने इतके प्रयत्न केले नाहीत, असे स्पष्टीकरण इम्रान खान यांनी दिले.