काबूल – ज्या कधी न्यायदेवता होत्या, त्या आज आपला जीव वाचविण्यासाठी देशातून पलायन करत आहेत. ही परिस्थितीत आहे अफगाणिस्तानामधील. तेथील महिला न्यायाधीश वेगवेगळ्या देशांमध्ये निर्वासित झाल्या आहेत. या महिला न्यायाधीशांची संख्या २५० आहे. तालिबानचे सरकार स्थापन झाल्यानंतर येथील सगळ्या कारागृहातून कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. महिला न्यायाधीशांनी शिक्षा सुनावलेल्यांध्ये तालिबानचे बंडखोर लढाऊ सैनिकही आहेत. ते कारागृहातून सुटल्यानंतर महिला न्यायाधीशांना जीवाची भीती सतावत आहे.
अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळविल्यानंतरच देशातील अनेक लोकांनी पलायन केले आहे. त्यामध्ये महिला न्यायाधीशांची संख्या अधिक आहे. काही महिला न्यायाधीशांनी आधीच देश सोडला आहे. तर काही अजूनही अफगाणिस्तानात फसलेल्या असून, तेथून निघण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला न्यायाधीश आणि त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली आहे. तालिबानने प्रशासनात आल्यानंतर महिलांना काम करण्यापासून रोखले आहे. तालिबान्यांनी महिला अधिकारांचे संरक्षण करत असल्याचा दावा केला असला तरी त्याबाबत काहीच पावले उचललेली नाहीत. त्यामुळे तेथील सर्व काम करणार्या महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
अफगाणिस्तानात न्यायनिवाडा करण्याच्या क्षेत्रातील महिला आधीपासूनच असुरक्षित राहिलेल्या आहेत. या वर्षी जानेवारीत सर्वोच्च न्यायालयाच्या दोन महिला न्यायाधीशांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. आता तर सर्वच कैद्यांची सुटका झाल्यामुळे सहाजिकच महिला न्यायाधीशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. अशाच एका न्यायाधीशाने युरोपात आश्रय घेतला आहे. या महिला न्यायाधीशांनी सांगितले, की चार-पाच तालिबान बंडखोर त्यांच्या घरी आले होते. तेव्हा त्यांनी विचारले की महिला न्यायाधीश कुठे आहे ? हे तेच तालिबानी होते ज्यांना त्या महिला न्यायाधीशाने शिक्षा सुनावली होती. नंतर त्यांनी एका गटासोबत तेथून पलायन केले. त्यांची सुटका करण्यासाठी न्यायाधीशांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने त्यांची मदत केली आहे.