मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा एकदा २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून तब्बल १ कोटी ८० लाख रुपये जमा केल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात पोलिसांना आणखी चौकशी करायची आहे. यासाठी सरकारी वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. त्याची दखल घेत न्यायालयाने सदावर्ते यांना आणखी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पोलिस आता सदावर्ते यांचा आणखी कसून तपास करु शकणार आहेत.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडण्याचे काम सदावर्ते यांनी स्विकारले होते. मात्र, सदावर्ते यांनी यात मोठा गैरव्यवहार केला. कर्मचाऱ्यांकडून पैसा गोळा केला. तब्बल १ कोटी ८० लाख रुपये सदावर्तेेंनी गोळा का केले, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत आजच्या सुनावणीत जोरदार युक्तीवाद करण्यात आला. मात्र, सदावर्ते यांना अशा प्रकारे कुठलेही पैसे जमा केले नसल्याचा दावा त्यांच्या वकीलाने केला.
सदावर्ते यांची चिथावणी दिल्यानेच आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पवार यांचे निवासस्थान गाठले. तेथे त्यांनी घोषणाबाजी केली. घराच्या दिशेने चप्पल भिरकावली. तसेच, घरात घुसण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी सदावर्ते यांना यापूर्वी २ दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. ती आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आता त्यांना पुन्हा दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.