नाशिक – येथील स्व. रामकृष्ण जगदाळे फाउंडेशन, नाशिक जिल्हा अॅडव्होकेटस क्रिकेट अॅण्ड स्पोर्टस असोसिएशन आणि नाशिक बार असोसिएशनच्या वतीने नाशिक शहरातील विविध १३ मैदानांवर वकिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक अॅड. विवेकानंद जगदाळे यांनी दिली. या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा रविवार, दि. २६ डिसेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ अखेर आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धेचे उद्घाटन, २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मकरंद कर्णिक, न्या. संदीप शिंदे, न्या. प्रकाश नाईक, पश्चिम मुंबई वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. संजीव कदम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस वाघवसे भूषविणार आहेत. यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे माजी अध्यक्ष अॅड. के. के. घुगे, अॅड.अविनाश भिडे, अॅड. जयंत जायभावे, माजी सदस्य अॅड. दौलतराव घुमरे, ट्रस्ट प्रॅक्टीशनर असोसिएशनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ अशोक खुटाडे, ज्येष्ठ विधीज्ञ के. जे. दिघे आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात नाशिक येथील ज्येष्ठ विधीज्ञ के.के. दिघे यांनी संकलित केलेले ‘दस स्पोक द ग्रेट जज’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. स्व. एम. सी. छागला यांच्या आत्मचरित्रातील निवडक उताऱ्यांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.
नाशिक शहरातील विविध १३ मैदानांवर आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेसाठी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. तब्ब्ल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी वकिलांमध्ये कमालीचे उत्साही वातावरण असून, राज्यभरातील वकिलांचा सहभाग असलेल्या ८० संघानी स्पर्धेसाठी नावनोंदणी केली आहे. क्रिकेट रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, तसेच उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन स्व. रामकृष्ण जगदाळे फाउंडेशन आणि नाशिक जिल्हा अॅडव्होकेटस क्रिकेट अॅण्ड स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विवेकानंद जगदाळे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितिन ठाकरे, नाशिक जिल्हा अॅडव्होकेटस क्रिकेट अॅण्ड स्पोर्टस असोसिएशनचे सचिव अॅड. राजाभाऊ ठाकरे यांनी केले आहे.