इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील खंडेला येथे एक गंभीर प्रकार घडला आहे. सुनावणीवेळी न्यायालयात एका वकिलाने स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर तो जबरदस्तीने उपविभागीय अधिकारी (प्रांत अर्थात एसडीएम) ला चिकटून बसला. त्यामुळे तेथे घबराटीचे वातावरण पसरले. या सगळ्या परिस्थितीमुळे लोक इकडेतिकडे धावू लागले. दरम्यान, वकिलाला गंभीर अवस्थेत जयपूरला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, उपचारादरम्यान वकिलाचा मृत्यू झाला.
एसडीएम हे सुनावणीच्या वेळी लाच मागतात असा आरोप वकीलाने केला होता. हा आरोप करतानाच त्याने स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर वकिलाला धक्काबुक्की करून एसडीएम तेथून निघून गेले. यादरम्यान एसडीएमचा हात भाजला असून, त्यांना जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वकीलालादेखील या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या बॅगेत एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यामध्ये एसडीएम राकेश कुमार यांना प्रत्येक सुनावणीला लाच मागितल्याचं सांगण्यात आलं आहे. हंसराज दहा वर्षांपासून वकिली करत होते.
गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास एसडीएम आपल्या दालनात बसले होते. यादरम्यान हंसराज अचानक तेथे पोहोचले आणि त्याने पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यानंतर हंसराजने बळजबरीने एसडीएमलाही पकडले, मात्र त्यांनी त्यांना ढकलून दिले. मृत वकिलाचा धाकटा भाऊ रामकृष्ण यांनी सांगितले की, तारखेच्या सुनावणीदरम्यान एसडीएम सर्व वकिलांकडून लाच मागतो. हंसराज नेहमी लाच देऊन त्रस्त होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी ही बाब नातेवाईकांनाही सांगितली होती. त्याचवेळी, एसडीएमने सांगितले की, सुनावणीदरम्यान हंसराजने एका प्रकरणात तारीख घेतली होती.
काही वेळाने त्यांनी पेट्रोल शिंपडून स्वतःला पेटवून घेतले. यानंतर दरवाजे बंद करून त्यांनी एसडीएम कोर्ट गाठले. पोलिसांच्या तपासात मयत वकिलाच्या बॅगेत पेट्रोलच्या दोन बाटल्या आणि जंतुनाशक सापडले आहे. सीकरचे पोलीस अधीक्षक कुंवर राष्ट्रदीप यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासत आहेत.