नाशिक – मराठा विद्या प्रसारक समाज ही साडे दहा हजार सभासदांची त्यात दहा हजार सेवक कार्यरत त्यातील साधारणतः ३५०० सेवक अनुदानित शाखांवर कार्यरत आहे अनेक सेवकांचे पगार सध्या चार चार महिने होत नाही, त्यात प्रामुख्याने सभासदांशी संबंधित नेमलेला कर्मचारी वर्ग तो विना अनुदानित शाखांवर तो सुद्धा तुटपुंज्या वेतनावर, मधल्या काळात त्यांची केलेली वेतन कपात, दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय संस्थेचा कर्मवीर निधी गोळा करण्याचा फतवा, जो स्वच्छेने जरी असला तरी बदली व प्रमोशनच्या भीतीमुळे कुणीही नाकारू शकत नाही त्याच बरोबर फक्त सरचिटणीस कुटुंबीयांकडून केल्या गेलेल्या व कार्यकारी मंडळाच्या परस्पर अतिरिक्त नेमणुका, त्यामुळे आर्थिक दिवाळखोरी कडे चालेली संस्थेची वाटचाल ही मनाला वेदना देणारी घटना आहे अशी अवस्था संस्थेची का झाली व कुणी केली ? याचा कुणीच विचार का करत नाही अशी पोस्ट मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी सभापती ॲड नितीन बाबुराव ठाकरे यांनी सोशल मीडियात केली आहे. यात विविध मुद्दे उपस्थितीत करुन आरोपही केले आहे.
या पोस्टमध्ये हे मुद्देही उपस्थितीत केले आहे. सभासदांच्या व इतर कोणत्याही व्यक्तीकडून विविध प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी फी सह लाखो रुपयांची डोनेशन घेतली जातात त्याचा नेमका विनियोग केला जातो का ? व तो कशा प्रकारे केला जातो हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे , मेडिकल महाविद्यालयातील मधील अवास्तव व अनियमित फी आकारणी सुद्धा एक महत्त्वाचा इशू सध्या संस्थेमध्ये आहे जो लपवला जातो
सेवकांकडून गोळा केलेल्या कर्मवीर निधीचा नेमका वापर कशा करता केला जातो हे सुद्धा समजले पाहिजे, त्याचा हिशोब दिला पाहिजे , गेली तीन वर्ष घेतलेल्या कोट्यावधी रुपयेच्या कर्मवीर निधीच्या पावत्या सुद्धा सेवकांना दिल्या नाहीत. संस्थेचा आर्थिक कारभारच पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे असे दिसते पूर्वीचे ३० कोटी कर्ज असताना संस्थेतील विविध शाखांमध्ये असलेल्या २५ कोटी डिपॉझिट वरती कर्ज घ्यावे लागते ते कर्ज घेतल्यानंतरही अनेक बिल्डर , विविध प्रकारचे कंत्राटदार डिलर इत्यादीचे बिले देण्यासाठी संस्थेच्या तिजोरीत खडखडाट झालेला दिसतो. त्याचे पडसाद जिल्हाभर आहे. अजून शंभर कोटी कर्ज घेण्याचा विचार विद्यमान कार्यकारी मंडळाचा दिसतो तशी चर्चा झाली असे खात्रीलायक समजते या सर्व आर्थिक गैर कारभाराची जबाबदारी कुणाची ?
संशयास्पद आर्थिक व्यवहार असलेल्या जमिनींची खरेदी, वाटेल तेथे जमीन खरेदी व बांधकाम करणे, गरज नसतानाचे अधिकचे बांधकाम ज्या शाळांमध्ये दहा-पंधरा हजार स्क्वेअर फूटची गरज आहे तेथे ८०-८० हजार स्क्वेअर फूट इमारतीचे अनावश्यक बांधकाम , कोणी प्रश्न विचारला तर गाव गर्जना करायची की प्रगती करायची आहे , नुसत्या बिल्डिंग उभ्या केल्या म्हणजे प्रगती नव्हे हे सांगण्याची वेळ आता आलेली आहे, शैक्षणिक कामकाज व गुणवत्तेकडे लक्ष देण्याऐवजी संस्था ही बिल्डिंग व्यवसाय करणारी एक कन्स्ट्रक्शन कंपनी झाली असे समाजामध्ये चित्र आहे
एकंदरीत संस्थेवरील कर्जाचा बोजा बघता मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल कारभार म्हणजे कार्यकारी मंडळाला अंधारात ठेवून चाललेले सर्व काही उद्योग शिक्षणाधिकारी पाटील व कुटुंबाच्या आर्थिक कल्याणाकरिता व ॲडजस्टमेंट करता नेमलेले स्वतंत्र कदम नावाचे ऑडिटर कम ॲडजेस्टमेंटकार ,टेंडर कमिटीचे अध्यक्ष संस्थेचे चिटणीस डॉ सुनील ढिकले यांची कार्यकारी मंडळाची परवानगी न घेताच अचानक नेमणूक रद्द करणे, ठराविक कंत्राटदारांना टेंडर बांधकामाचे टेंडर फॉर्म देणे, कार्यकारी मंडळाचे ठराव नसताना लाखो रुपयांचे परस्पर दिलेले ॲडव्हान्स , मेडिकल स्टोअर्स मध्ये कोरोना काळात केलेल्या व चालू असलेल्या कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार, आजी-माजी संचालकांच्या नातेवाईकांसह व अनेक सभासद व सामान्य जणांचे झालेले दर्दनाक मृत्यू, रेमडीसिवहर इंजेक्शनचा काळाबाजार, त्या अनुषंगाने काही सेवकांचे केलेले निलंबन व बदल्या सर्व काही सांगून जाते, मेडिकल कॉलेजमधील स्वच्छता कामकाजाबाबत बीव्हीजी कंपनीचे रद्द केलेले कंत्राट व तेच काम भागीदारीत सुरू केलेले कुटुंबातील घटकांचे कामकाज, विविध होरायझन बांधकामांमध्ये पार्टनरशिपचा अलिखित बांधकाम व्यवसाय हे सर्वकाही झाकण्यासाठी व सभासदांची मनधरणी करण्याकरीता अलिशान वातानुकूलित गाड्यांमधून दारोदारी भेटून चाललेली संपूर्ण कुटुंबाची काही तरी गुप्त धडपड, नवीन वारसा सभासद करण्याच्या प्रक्रियेमधील मोठा गफला व कार्यकारी मंडळ सदस्यांचे अक्षम्य दुर्लक्ष त्यामुळेच संस्थेचा शतकोत्तर प्रवास ” शतकीपार “कोटी कर्जाकडे चालू आहे याचे शल्य मला आहे. संस्थेचे सार्वभौमत्व टिकले पाहिजे त्याच बरोबर अवाढव्य कर्जापासून संस्थेची मुक्तता झाली पाहिजे म्हणून हा माझा पत्र प्रपंच आपल्या माहिती साठी व समाज जागृती करता असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.