मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, अन्य १०९ जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सर्व जणांना मुंबई पोलिसांनी काल अटक केली होती. या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयने हा निर्णय दिला आहे.
सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले की, सदावर्तेंनीच एसटी आंदोलकांना भडकवले. त्यामुळेच आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी थेट पवार यांचे निवासस्थान गाठले आणि हिंसक आंदोलक केले. यासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली. अखेर न्यायालयाने चौकशीसाठी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, अन्य १०९ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.