मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्यात सदावर्ते यांची भूमिका महत्त्वाची असल्याचा आरोप आहे. त्याअंतर्गतच सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते तुरुंगात आहेत. त्यातच आता या हल्ल्यातील दोन आरोपींनी धक्कादायक कबुली दिली आहे. या हल्ल्यामध्ये जे काही झाले तरे सर्व सदावर्तेंनी केले अशी कबुली या आरोपींनी दिली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्यावरील आरोप सिद्ध होण्यात आणि त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हे आहेत.
मिळालेल्या माहिनुसार, या हल्ल्यातील आरोपी चंद्रकांत सूर्यवंशी आणि अभिषेक पाटील यांनी न्यायाधीशांकडे मोठी कबुली दिली आहे. त्यांनी सांगितले की, या हल्ल्यात आमची कुठलीही भूमिका नाही. जे काही केले आहे त्यात सदावर्ते यांची भूमिका मोठी आणि महत्त्वाची आहे. मुंबई पोलिसांच्या हाती एक फोन संभाषण लागले आहे. एसटी कर्मचारी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यातील तो संवाद आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सदावर्ते यांनीच चिथावणी देत पवार ांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचे सूचित केले. याप्रकरणी सदावर्ते यांच्यासबरोबरच एकूण १०९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, न्यायालयात सुनावणीही सुरू झाली आहे.