मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत सरकारी वकीलांनी आज मोठा खुलासा केला आहे. सदावर्ते यांच्या घरात चक्क नोटा मोजण्याचे मशीन सापडले आहे. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांकडून सदावर्ते पैसे उकळत असल्याचेही निदर्शनास आले आहे. यासंदर्भात सदावर्ते यांच्याकडील हिरव्या रंगाच्या वहीमध्ये यासंदर्भात नोंदी आढळून आल्या आहेत. त्यात नमूद केले आहे की राज्यातील २५० डेपोंमधून सदावर्ते पैसे गोळा करायचे.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने त्यांची न्यायालयात बाजू मांडण्याचे काम सदावर्ते करीत होते. एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशातूनच सदावर्ते यांनी भायखळा आणि परळ येथे प्रॉपर्टी तर एक आलिशान कारही खरेदी केल्याचा संशय आहे. सदावर्ते यांच्या घरात नोटा मोजण्याचे मशीन सापडले आहे. विशेष म्हणजे, वकीलाच्या घरी असे मशीन असण्याचे काहीच कारण नाही. तसेच, त्यांच्या घरात काही संशयास्पद कागदपत्रे आढळली असल्याने त्यांची सखोल चौकशी होण्यासाठीच पोलिस कोठडी मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे घरत यांनी म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होते, न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.