इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापेमारी करुन ३ महिला आणि २ पुरुषांना ताब्यात घेतले असून त्यात एकनाथ खडसे यांचा जावई प्राजंल खेवलकर यांना सुध्दा या प्रकरणात अटक झाली. त्यानंतर या कारवाईबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. प्रसिध्द वकील असीम सरोदे यांनी NDPS कायदा आणि डॉ प्रांजल यांच्या केसबाबत एकनाथ खडसे साहेबांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी चौकशी दरम्यान अनेक कायदेशीर चुका केल्या आहेत. काही लोकांना ‘आरोपी’ म्हणून बदनाम करण्यासाठी त्यांच्या घरात घुसून शूटिंग करणे तो व्हिडिओ व्हायरल करणे पोलिसांना भोवणार. इतरांच्या खाजगी आयुष्याचा अपमान करणारे हे कोणते पोलिसिंग आहे? राजकीय हेतुप्रेरित पोलिसिंग बंद करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शनिवारी प्राजंल खेवलकर यांना फ्लॅटमध्ये पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली. खराडी येथील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरु होती. यात प्राजंल यांचा एक मित्र आमित तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का, आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांनी दावा केला होता. आता या दाव्यावरच प्रश्न उपस्थितीत करण्यात आले आहे.
अॅड. असीम सरोदे यांनी याप्रकरणी पोलिसांनी खासगी पार्टीला रेव्ह पार्टीचे स्वरुप दिले, कोकेनचा पुरावा प्लॅन्ट करुन त्या लोकांना समाजापुढे आरोपी असल्याचे चित्रं उभे केल्याचाही दावा केला. हे प्रकरण उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता असून पुणे पोलिसांची अडचण वाढणार आहे. पुणे पोलिसांनी राजकीय उद्देश ठेऊन दृश्यम चित्रपटाप्रमाणे खोटं चित्र रंगवल्याचा दावा सुध्दा केला आहे. घरामध्ये दारु पिणे हा गुन्हा नाही. पण, पोलिसांनी याला रेव्ह पार्टींचे स्वरुप दिले. पोलिसांनी राईट टु प्रायव्हसीचा गंभीर प्रकारे भंग केला आहे असेही ते म्हणाले.
याअगोदर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिण खडसे यांनी सुध्दा सोशल मीडियात फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल…जय महाराष्ट्र!