औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसंवाद यात्रेअंतर्गत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे आले होते. यावेळी डीजे बंद केल्याच्या कारणावरून चांगलाच राडा झाला. त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. गोंधळ वाढत असतानाच पोलिसांनी आघाडी घेतली. पोलिस बंदोबस्तातच ठाकरेंचा ताफा बाहेर काढण्यात आला. यासंपूर्ण प्रकरणानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संविधान रक्षणासाठी शिवशक्ती – भीमशक्ती एकत्र आली आहे. एकमेकांना समजून घ्यावे लागते, असे ते म्हणाले.
महालगावातील कार्यक्रम स्थळापासून हाकेच्या अंतरावर रमाबाई आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम सुरू होता. कार्यकर्ते डीजे लावून जयंती उत्सव साजरा करीत होते. या डीजेचा आदित्य यांच्या भाषणाला अडथळा येत असल्याचे पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डीजे बंद करायला लावला. यातून वाद झाला. यानंतर हा वाद चिघळला. हे लक्षात येताच आदित्य यांनी स्टेजवरून उतरून उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी शिवशक्ती, भीमशक्ती यांची युती झाली आहे. मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला डीजे वाजवायचा असेल तर वाजवा, असे म्हणाले. मात्र डीजे बंद केल्याने तेथे गदारोळ झाला. गदारोळ ऐवढा वाढला की, पोलिस बंदोबस्तात त्यांचा ताफा बाहेर काढावा लागला.
आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक
यावेळी तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कडक बंदोबस्तात आदित्य यांचा ताफा महालगावातून बाहेर काढला. यावेळी काहींनी या ताफ्यावर दगडफेक केल्याने तणाव वाढल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. पोलिसांनी महालगावात शांतता असल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
या साऱ्या प्रकारावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माईकवर बोललो, काही कारणास्तव साऊंड बंद झाला असेल. एकमेकांना समजून घ्यावे लागते. मी माईकवर माफीही मागितली. संविधानाच्या रक्षणासाठी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आलीय. काही अडचण आली असेल तर माफी मागतो. पण एवढे मोठे कारण नाही. डीजे ५-१० मिनिटांसाठी बंद केला असेल. पण, मी माईकवर सांगितले डिजे चालू द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
Aditya Thackeray Reaction on DJ Clash Aurangabad