इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.
एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे, किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे.