इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी करण्याचे एक नवीन तंत्र आले आहे. ‘पठाण’ला झालेला याचा फायदा आपल्याला बॉक्स ऑफिसवर दिसलाच. त्यानंतर अनेक चित्रपटांच्या बाबतीत हाच ट्रेंड दिसला. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट तर निर्मितीपासूनच वादात होता. त्याच्यातील दृश्ये, पात्रांचे संवाद यावर ट्रेलरपासूनच आक्षेप घेण्यात आला. तरीही कदाचित निगेटिव्ह पब्लिसिटीच्या स्टंटचा आपल्याला फायदा होईल, अशा भावनेतून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली ही सगळी दृश्ये तशीच ठेवण्यात आली. मात्र, तरीही चित्रपटाला काही फायदा होताना दिसत नाही. चित्रपटाचे सातव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा व्यवसाय सातत्याने मंदावत चालला आहे.
बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम
प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट विरोधानंतरही चांगला चालेल अशी अपेक्षा होती. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने दमदार सुरुवात केली देखील. पहिल्या वीकेंडमध्येच जगभरात या चित्रपटाने ३०० कोटींचे कलेक्शन केले. आता मात्र ‘आदिपुरुष’ची अवस्था बिकट झाली आहे. हा चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. आता या चित्रपटाविरोधात तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच सगळ्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील होत आहे. या चित्रपटाचे सातव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले असून या कलेक्शनचे आकडे काही फारसे दिलासादायक नाहीत.
ट्रोल होत असल्याने संवादात बदल
५०० कोटींहून अधिक बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या निर्मात्यांना आता बॉक्स ऑफिसचे आकडे बघून टेन्शन आले आहे. बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे निर्मात्यांनी वादग्रस्त संवादांमध्ये बदल देखील केले आहेत. इतकेच नाही, तर प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यासाठी तिकिटांचे दरही कमी केले गेले आहेत. मात्र, तरीही या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.
आतापर्यंतचे कलेक्शन
‘आदिपुरुष’च्या कलेक्शनच्या नव्या आकड्यांवर नजर टाकली, तर या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात येईल. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, सातव्या दिवशीही आदिपुरुषच्या कलेक्शनमध्ये कमालीच घट झाली आहे. या चित्रपटाने गुरुवारी (२२ जून) देशभरात केवळ ५.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह, ‘आदिपुरुष’ने सात दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण २६० कोटींचे कलेक्शन केले आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (१६ जून) देशभरात ८६.७५ कोटींचे कलेक्शन केले होते. यानंतर या चित्रपटाने शनिवारी ६२.२५ कोटी आणि रविवारी ६९.१० कोटींची कमाई केली. सोमवारी या चित्रपटाचे काहीच कलेक्शन झाले नाही. सोमवारी अवघे १६ कोटी कमावले. मंगळवारी १०.७० तर बुधवारी ७.५० कोटींची कमाई केली.