मुंबई – देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि गोदरेज इंडस्ट्रिजचे चेअरमन आदी गोदरेज यांनी कंपनीच्या चेअरमनपद आणि संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. आदी यांचे लहान भाऊ नादीर गोदरेज हे येत्या एक ऑक्टोबरपासून कंपनीच्या चेअरमनपदासह व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारणार आहेत, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या नादीर गोदरेज हे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर कार्यरत आहेत.
आपल्या निरोप समारंभात आदी गोदरेज म्हणाले की, गोदरेज इंडस्ट्रिजच्या चेअरमनपदावर चार दशके काम करणे माझ्यासाठी सुदैवाची बाब आहे. माझ्या कार्यकाळात कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. त्यासाठी कंपनीच्या प्रत्येक सदस्याला मी मनापासून धन्यवाद देतो. कंपनीला पुढे घेऊन जाण्यासाठी ज्यांनी मोलाचे सल्ले देऊन सहकार्य केले अशा संचालक मंडळाचाही मी आभार मानतो. यादरम्यान चांगले आर्थिक निकाल आलेच, शिवाय सकारात्मक परिवर्तन पाहायला मिळाले. गोदरेज ग्रुपचे चेअरमन आणि जीआयएलचे मानद चेअरमनपदी आदी गोदरेज कायम राहतील, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.
त्याशिवाय आदी गोदरेज यांनी संचलाक मंडळाच्या सदस्य, ग्राहक, व्यावसायिक भागिदार, शेअरधारक, गुंतवणूकदारांचे आभार मानले. कंपनीचे नवे चेअरमन नादीर गोदरेज यांनी गोदरेज इंडस्ट्रिजच्या संचालक मंडळाला त्यांच्या नव्या भूमिकेबद्दल तसेच त्यांचे नेतृत्व स्वीकारल्याबद्दल धन्यवाद दिले. कंपनीला पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले. गोदरेज कंपनीचा समुह देशासह १८ इतर देशात सहाय्यक कंपन्यांच्या माध्यमातून कार्यरत आहे.