नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोण हे अधोक्षजानंद? क्षमा करा, त्यांना ‘परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देव तीर्थ’ या नावाने ओळखले जाते. ते कोणत्याही पीठाचे अधिकृत शंकराचार्य नाहीत, मात्र ते स्वत:ला जगन्नाथपुरीच्या गोवर्धन पीठाचे शंकराचार्य म्हणवून घेतात. त्यासाठी गेली १२-१५ वर्षे वाद आणि कोर्ट कचेऱ्या सुरु आहेत. त्यांना मानणारा मूठभर वर्ग आहे. सनातन वैदिक धर्मातील शास्त्रांचे निरुपण करण्याऐवजी ते प्रचलित राजकारण, पक्ष आणि नेते यांच्यावरच तोंडसुख घेण्यात धन्यता मानतात. म्हणूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरपूर तोंडसुख घेतले आहे. आणि त्यांनाच आता नाशिक दौऱ्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारकडून चक्क व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार आहे, हे सुद्धा विशेष
आज अचानक त्यांचे स्मरण होण्याचे कारणही तसेच आहे. हे स्वामी देशातील १२ ज्योतिर्लिंग आणि ५२ शक्तिपीठांच्या दर्शनासाठी निघाले आहेत. त्यांच्यासोबत लवाजमा आहे. प्रवास अर्थातच ‘हवेतून’ आहे. ते दि. ६ डिसेंबर ते १३ डिसेंबर असे महाराष्ट्रात फिरणार आहेत. त्यांनी म्हणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. मुंबई, नाशिक, अहमदनगर आणि पुणे येथे त्यांना संपूर्ण ‘व्हीव्हीआयपी’ सुविधा हव्या आहेत. त्या पत्रात, राहण्यासाठी शासकीय अतिथीगृह, व्हीआयपी कार, पोलिस एस्कॉर्ट, पायलट कार, हाऊस गार्ड आणि अन्य सुविधांची मागणी करण्यात आली आहे. गंमत म्हणजे, सचिवालयाकडून जिल्हाधिका-यांना तशा स्पष्ट सूचना आणि आदेश पाठविण्यात आले आहेत
कशासाठी हे सारे!! जनतेने घाम गाळून भरलेल्या करावर ही ‘ऐष’ कशासाठी? आणि त्याचा लाभ तो काय? महाराष्ट्र शासनाने का म्हणून हा पैसा खर्च करायचा? या स्वामींची ‘कुंडली’ मांडण्यापूर्वी एक गोष्ट आठवली… इसवी सन पूर्व ५०० वर्षापूर्वी ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस होऊन गेला. हा पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा जनक. भोवताली असलेल्या चाहत्यांनी एकदा विचारले, “कशावरून आपण जगातील श्रेष्ठ तत्त्ववेत्ते आहात?” त्यावर सॉक्रेटिसने दिलेले उत्तर अंतर्मुख करणारे आहे. सॉक्रेटिस म्हणाला, “तत्त्वज्ञानाच्या बाबतीत ग्रीस हा विचारवंतांचा देश आहे, त्यातही ‘अथेन्स’ तर तत्वज्ञानाचे माहेरच आहे. त्या अथेन्समध्ये मी राहतो आणि येथील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ मीच तर आहे. म्हणजे मीच जगातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ, जगद्गुरु नाही का!!!” यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी सध्या जगातील सर्वच धर्मांच्या स्वयंघोषित जगदगुरुंची अवस्था अशीच आहे. तर त्यातीलच हे एक तथाकथित शंकराचार्य अधोक्षजानंद.
आद्य शंकराचार्य यांनी आठव्या शतकात, देशातील धर्म-प्रजेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, शृंगेरी आणि द्वारका या चार दिशांना मठांची स्थापना केली. वैदिक सनातन धर्माचे आचार-विचार, संस्कृती यांचा प्रचार आणि कालानुरूप नियंत्रण करण्यासाठी चार शंकराचार्यांना नियुक्त करण्यात आले. पुढे कांची हे पाचवे पीठ स्थापण्यात आले. प्रजेचा विस्तार आणि आवश्यकता लक्षात घेऊन मुख्य पीठांनी काही राज्यात उप-पीठे स्थापन केली. त्यातून वादांचे प्रसंग उद्भवले. अनेकांनी स्वतःला ‘जगदगुरु शंकराचार्य’ म्हणून घोषित करून टाकले, आज देशातील शंकराचार्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. साधे राहावे, देश भ्रमण करावे, धर्मप्रजेला भेटावे, त्यांची सुख-दु:खे जाणून घ्यावीत, सुविधा आणि सर्वसंगांचा त्याग करावा, हे ग्रंथात सांगितलेले शंकराचार्यांचे आचार-धर्म. पण हे तथाकथित शंकराचार्य त्यागाऐवजी भोगच घेत सुटले आहेत. आणि हे भोग-विलास त्यांना मोफत हवे आहेत. पण कोणाच्या जीवावर? यांना पोलीस एस्कॉर्ट, पायलट कशासाठी हवे आहे? एवढी सुरक्षा त्यांना कशासाठी हवी? आणि त्यांना भीती तरी कोणाची आहे?
हा विषय शंकराचार्यापर्यंत थांबत नाही. देशाच्या चारही दिशांना मठाधिपती, महंत, जगद्गुरु, महामंडलेश्वर, यांचे पीकच आले आहे. भोगविलासाचा हा सर्वात जवळचा – शॉर्टकट- मार्ग आहे! एकीकडे जगातील अन्य देशात, सनातन वैदिक संस्कृतीची निंदानालस्ती सुरू असतांना हे तथाकथित ‘भगवेधारी’ करतात तरी काय? आपल्या भोवती चार ‘खाकीधारी’ असावेत, यासाठी हे शासनाचे उंबरठे झिजवतात! बरं, यांची चौकशीही कोणीच करीत नाहीत. यांची निवड, आचार, नियम कोणालाच ज्ञात नाहीत. शासन नको तेथे आपल्या चौकशी यंत्रणा वापरते, मग या भगव्याधाऱ्यांबाबत गप्प का? शासन-प्रशासनाल भगवे वस्त्र दिसले की ‘हुडहुडी’ का भरते?
अलिकडे आधुनिक काळात आपला उपदेश, प्रवचने कोणी ऐकत नाही म्हटल्यावर ही तथाकथित मंडळी प्रक्षोभक राजकीय विधाने करीत सुटतात. त्यामुळे फुकटची प्रसिद्धी मिळते. मग विविध राजकीय पक्ष, सत्ता यांना जवळ करू लागतात. अर्थात् हे मतांसाठीचेच उद्योग असतात. आणि दुसरीकडे हे तथाकथित शंकराचार्यादि फुकटचे मिरवून घेतात. असे हे ‘साटेलोटे’ आहे. समाजासाठी हे काहीच करीत नाहीत.
तर त्यांच्यापैकी हे ‘गोवर्धन (पुरी) पीठाचे स्वयंघोषित शंकराचार्य अधोक्षजानंद’. यांनी तेथील अधिकृत शंकराचार्य पू. स्वामी निश्चलानंद यांना सळो की पळो करून सोडले आहे. एवढेच नव्हे तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत, पंतप्रधान नरेन्द्र मोदींविरुद्ध यथेच्छ गरळ ओकली आहे. असे हे, ‘निर्भय विचार आणि राजकीय सत्तेवर भगवा अंकुश ठेवणारे(!) स्वामी’ दि. ७ व ८ ला नाशकात आहेत. आणि त्यांना व्हीव्हीआयपी सुविधा देण्यास शिंदे-फडणवीस सरकारने मान्यताही दिली आहे. परिणामी, नाशिक प्रशासनाने त्याची दखल घेत शाही व्यवस्थेचे फर्मानही काढले आहे.
एक जुनी आठवण, यापूर्वी शृंगेरी आणि कांची पीठाचे शंकराचार्य दिग्विजय यात्रेनिमित्त दोन वेळा नाशिकला येऊन गेले. दोघेही कोणत्याही सर्किट हाऊसमध्ये उतरले नव्हते. त्यांनी पोलिस सुरक्षा मागितली नव्हती. आणि स्वतःचीच वाहन व्यवस्था उपयोगात आणली होती. असो. आपण मात्र दोन दिवस या “स्वयंघोषित व्हीव्हीआयपी जगद्गुरु शंकराचार्यांच्या सत्संगांचा(!) लाभ घेऊया.
Adhokshajanand Nashik Tour VVIP Treatment Government
State Guest