नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. भाजप नेते आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. हा प्रस्ताव संसदेत मान्य करण्यात आला. विशेषाधिकार समिती त्यांच्या विरोधात अहवाल सादर करेपर्यंत अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. संसदीय कामकाजात व्यत्यय आणल्याच्या आणि देशाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली हे प्रकरण आता विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले आहे. विशेषाधिकार समिती याप्रकरणी निर्णय घेईपर्यंत चौधरी निलंबित असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलतांना अधीर रंजन चौधरी यांनी धृतराष्ट्र आंधळा होता, तेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले होते. आजही राजा आंधळाच आहे. मणिपूर आणि हस्तिनापूरमध्ये कसलाच फरक नाही. नरेंद्र मोदी नीरव मोदीसारखे शांत बसले आहेत. भाजपाने मणिपूरच्या खासदाराला संसदेत बोलण्याची संधीदेखील दिली असे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांच्यावर संसदीय कामकाजात सतत व्यत्यय आणल्याचा आणि देशाची बदनामी केल्याचा आरोप केला होता. सभापतींनी अनेकदा इशारा देऊनही चौधरी यांचे वागणे बदलले नाही असेही जोशी यांनी म्हटले. तसेच याप्रकरणी त्यांनी माफीदेखील मागितली नसल्याचे जोशी यांनी सांगितले.
या कारवाईनंतर चौधरी म्हणाले, पंतप्रधानांचा अनादर करणे हा माझा उद्देश नव्हता. मी केवळ धृतराष्ट्र आणि द्रौपदीचे उदाहरण दिले होते. भाजपाचा एक धिप्पाड खासदार माझ्यावर हल्ला करण्यासाठी आला तेव्हा मी कुठलीही तक्रार केली नव्हती. ते सध्या बहुमताचे राजकारण करत आहेत. मी कुठलाही चुकीचा शब्द उच्चारला नव्हता. तुम्ही कुठल्याही घटनातज्ज्ञाला जाऊन विचारा.
Adhir Ranjan Chowdhury suspended from Lok Sabha