अधिक मास विशेष (भाग ९)
दहापट पुण्यदायी विष्णुपुराण
यावर्षी श्रावणाच्या रुपांत अधिक मास आल्यामुळे दुधांत साखर पडली आहे. मुळात श्रावण मास हा मानवी जीवनात अधिक पुण्यदायी असतो. त्यात यंदा अधिक श्रावण मास आला आहे.या अधिक पुरुषोत्तम महिन्यात महर्षी पराशर ॠषींनी रचलेले श्री विष्णु पुराण हे अठरा पुराणांमध्ये श्रेष्ठ पुराण आहे. त्याचे श्रवण वा वाचन करणे हे दहापट पुण्यदायी आहे असे सर्वच कथा निरूपणकार अधिकार वाणीने सांगतात. त्यामुळेच इंडिया दर्पणच्या भाविक वाचकांसाठी उद्या पासून आपण श्री विष्णु पुराणातील कथा सादर करणार आहोत.
मुळात विष्णुपुराण संस्कृत भाषेत आहे. त्याच्यामध्ये कालमानानुसार फेरबदल होत गेलेले असून मूळच्या ग्रंथाचा कालखंड निश्चित करता येत नाही. मात्र विष्णुपुराणांत राजांच्या ज्या वंशावळी दिल्या आहेत ती घराणी ४थ्या/५व्या शतकांपूर्वी देखील नव्हती असे संशोधक म्हणतात.
दुसरी गोष्ट अशी आहे की, पुराणांचा कालक्रम ठाऊक नसल्यामुळे निश्चित अशी क्रमवारी ठरविता येत नाही. काही सहितांमध्ये या विष्णुपुराणाला पहिले, काहींत तिसरे तर देवीमाहात्म्यात आठवे असे म्हटले आहे. या पुराणांखेरीज उप-पुराणेही आहेत व त्यांची संख्या तेवीस आहे.
सर्वच्या सर्व पुराणे व इतर शास्त्रे ही महर्षी कृष्णद्वैपायन व्यास यांनी कथन केली. तथापि या विष्णुपुराणाची संहिता महर्षी पराशरांनी मुनी मैत्रेय यांना पुनश्च कथन केली म्हणून याला ‘पराशरसंहिता’ असेही म्हटले जाते. तरीही पुराणांची रचना केव्हा आणि कसकशी होत गेली याविषयी निश्चित असे काही ठरविता येत नाही.
जुन्या वैदिक वाङ्मयातून पुराण हा शब्द इतिहास अशा अर्थाने आलेला आहे. गौतमशास्त्रामध्ये पुराणांना धर्मशास्त्रीय ग्रंथ असे म्हटले आहे.
महाभारत व पुराणात पुराणांची मुख्य अशी पाच लक्षणे सांगितली आहेत. ती अशी –
१) सर्ग अर्थात सृष्टीची निर्मिती, २) प्रतिसर्ग अर्थात प्रत्येक प्रलयानंतरची पुननिर्मिती, ३) वंश अर्थात घराण्यांच्या परंपरा, ४) मन्वंतर म्हणजे मनू व त्यांचा विस्तार आणि ५) वंशानुचरित म्हणजे राजांची चरित्रे. पण आज उपलब्ध असलेल्या संहितांमध्ये वरील अनुक्रम पाळला गेल्याचे दिसत नाही. विष्णुपुराण मात्र वरील पाच लक्षणांशी बर्याच प्रमाणात मिळते जुळते आहे शिवाय पद्मपुराणात पुराणांचे जे सात्त्विक, राजस व तामस असे वर्गीकरण केले आहे, त्यानुसार हे पुराण ‘सात्त्विक’ असे ठरविले आहे. या पुराणाचे सहा अंश म्हणजे खंड असून एकूण १३४ अध्याय आहेत.
यांतील पहिल्या अंशात सृष्टीची, देवांची आणि राक्षसांची उत्पत्ती कथन केली आहे शिवाय समुद्राचे मंथन केल्याची कथा आहे. दुसऱ्या भूलोक, पाताळलोक व स्वर्गलोक यांची माहिती आहे. तिसऱ्या अंशात मनू व मन्वंतरे यांची माहिती आहे. चौथ्या अंशात सूर्यवंशीय राजांच्या वंशावळी आणि इतिहास दिला आहे.पाचवा अंश संपूर्ण श्रीकृष्णचरित्राने भरला आहे. सहाव्या अंशात कलियुगाचे भाकीत आहे.
या सर्वच्या सर्व पुराणांच्या अवलोकनातून सृष्टीच्या रचनेचा क्रम, प्रलयांचे वर्णन, भरतखंड व त्यांतील लोकांची जीवनपद्धती, सनातन धर्म, आचारविचार, भौगोलिक रचना, संस्कार, पंथ व उपपंथ व त्यांचे तत्त्वज्ञान यांची माहिती मिळते.
प्रत्येक पुराणात त्या त्या पुराणाच्या आधारभूत अशा प्रमुख देवतेचे महत्त्व सांगितलेले असते. तसेच याही पुराणात विष्णूचे गुणवर्णन केलेले आहे. त्याचे मूळ सत्तेशी असलेले एकरूपत्व वारंवार कथन केले आहे.
या पुराणाचे लेखन करताना इतर ग्रंथांचे अवलोकन करून मुख्यत्वे रामानंद ठाकुर यांनी लिहिलेल्या गीताप्रेसच्या संशोधित विष्णुपुराणातील कथानुसंधान स्वीकारले आहे. ‘इंडिया दर्पण’ च्या वाचकवर्गाला नजरेपुढे ठेवून प्रचलित असलेली भाषा यात उपयोगात आणली आहे. दहापट पुण्यदायी अशा “श्रीविष्णु पुराण” मधील या कथा- काहण्या सर्व वाचकांच्या पसंतीस पडतील अशी अशा आहे.
श्री विष्णु पुराण कथासार उद्यापासून शुभारंभ
संकलन व सादरकर्ते :- विजय गोळेसर (मोबा. ९४२२७६५२२७)