अधिक मास विशेष (भाग ८)
अधिक मासात कोणते संकल्प करावेत?
कहाणी पुरुषोत्तम मासाची!
आज मी तुम्हाला पुरुषोत्तम मासाची आणखी एक कहाणी सांगणार आहे. ही कहाणी मी श्रावण महिन्यातील कहाणीच्या पारंपारिक ढंगात सांगणार आहे .कृपया ती गोड मानून घ्यावी ही विनंती.
ऐका पुरुषोत्तमदेवा तुमची कहाणी. सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप पळते. मनीं धरावें तें मिळतें, जन्माचे सार्थक होतें.
अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. तिथे दोघे भाऊ राहात होते. मनानं श्रीमंत परंतु धनानं गरीब. मोठ्याच्या बायकोचं नांव होतं रूपवती. धाकट्याच्या बायकोचं नांव होतं मुग्धा. एकदां ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठीं परगांवी गेले. तेव्हांपासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. धाकट्या जावेकडून बटकीसारखी काम करवून- घेई. तिच्यावर सारखी आग पाखडी. एकदां तर थोरली एवढी संतापली कीं तिनं धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी, एका शेजारणीच्या ओसरीवर राहूं लागली.
त्या वर्षी अधिकमास आला. थोरलीनं पुरुषोत्तमव्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही तें व्रत करावं. म्हणून ती थोरल्या जावेच्या घरीं गेली, म्हणाली, जाऊबाई जाऊबाई, पुरुषोत्तमव्रत करायची माझी इच्छा आहे. परंतु मला त्या व्रताची कांहीच माहिती नाहीं. तुम्ही मला सगळा व्रतविधि सांगाल का ? थोरली होती कपटी आणि भारी दुष्ट. ती धाकटीला म्हणाली, तूं आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते. पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन तें दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाहीं. धाकटीनं कबूल केलं. थोरलीनं दुष्टपणानं उगीच काहीतरी खोटंनाटं रचून तिला सांगितलं. म्हणाली, अधिकमास म्हणजे मलिनमास. या महिन्यांत आपणही मलिन राहायचं. मलिन गढूळ पाण्यांत स्नान करायचं. मळकट वस्त्रं वापरायचीं, शिळेपाके उष्टेखरकटे पदार्थ खायचे. घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा पिंपळा, माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल.
धाकटीला ते खरं वाटलं. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरीं जेवायला बोलावू लागली. होतां होतां उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं १०८ ब्राह्मणांना जेवायचं आमंत्रण दिलं. तिचं ऐकून धाकटीनंही ब्राह्मणांना जेवायला बोलावलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही. रोजच्या प्रमाणं ती पिंपळाला म्हणाली,
” देवा देवा, माझ्या घरीं आज उद्यापन आहे. तूं जेवायला ये. तेव्हां पिंपळातून श्रीविष्णु प्रगट झाला. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तो तिला म्हणाला, ठीक आहे. मी जेवायला येतो. कोणी विचारलंच तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग.
धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरांत काय होतं नव्हतं तें गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्यांत श्रीविष्णु जेवायला आला. तो तिला म्हणाला, ताई, बाहेर १०८ ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी तँ विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं, मग १०८ ब्राह्मणांना कसं जेवण घालणार ? घरांत अन्नाचा आणखी एकही दाणा नव्हता. आतां काय करायचं ? विष्णूनं तिची चिंता दूर करायचं ठरवलं.
तो म्हणाला, आतां असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीनं विष्णूच्या सांगण्याप्रमाणं केलं. मग विष्णूनं त्या पानाचे १०८ तुकडे केले. द्रोणाचे १०८ तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले. धाकटीनं ती पानं मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हां श्रीविष्णूच्या कृपेनें १०८ पात्रं पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण आले जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले.
तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. तिनं तयार केलेले सर्व पदार्थ नाहींसे झाले. १०८ ब्राह्मण उपाशी राहिले. रागानं तिला शाप देत निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे. तशांत आपण तिला खोटंनाटं सांगितलं आणि तरीही तिनं १०८ ब्राह्मणांना भोजन कसं दिलं, याचं थोरलीला नवल वाटलं. ती तशीच लगबगीनं धाकट्या जावेकडे गेली. धाकटीनं थोरल्या जावेला आदरानं लवून नमस्कार केला. म्हणाली, तुम्हीं सांगितल्याप्रमाणं मी अधिकमासाचं व्रत केलं. म्हणूनच भगवान श्रीविष्णु प्रसन्न झाले. आणि त्यांच्या कृपेनंच उद्यापन देखील यशस्वीपणानं पार पडलं.
धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिनं ते खरं मानून भक्तीभावानं व्रत केलं, म्हणूनच तिला भगवान विष्णु प्रसन्न झाले, हे थोरलीनं मनोमन जाणलं. ती खजील झाली. तिनं धाकटीचे पाय धरले. तिची क्षमा मागितली. तेव्हां आकाशवाणी झाली.
“जे कोणी श्रद्धेनें अधिकमास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईन. त्यांच्या सर्व मनकामना पूर्ण करीन..”
त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदांत वागूं लागल्या. श्रीपुरुषोत्तमाच्या कृपेनं त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या. त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली, तशीच त्या श्रीपुरुषोत्तमाचे कृपेने तुम्हाआम्हाला मिळो ! ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सफल संपूर्ण.
ॐ विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः ॥
अधिक मासातील ३३ संकल्प!
अधिक मासात तीस + तीन = ३३ या संख्येला खूप महत्त्व असते. अनेक जण अधिक मासानिमित्त ३३ जणांना वाण, ३३ जणांना भोजन, ३३ जोडप्यांसह सामुहिक पूजा, ३३ जणांना दान असे नानाविध संकल्प करून अधिक फलप्राप्ती करून घेतात. आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात काही करणे शक्य नसले, तरी सहज साध्य करता येतील असे काही संकल्प आहेत. ते ३३ संकल्प जाणून घेण्या आधी या संख्येमागील गणित समजावून घेऊया.
तीस + तीनच का?
चैत्रापासून फाल्गुनापर्यंत १२ महिन्यात ३५५ दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस ३६५ असतात. हे १० दिवस तीन वर्षांनी ३० दिवस झाल्यावर एक महिना अधिक घालून ते पुन्हा सारखे होतात. म्हणजे, दर ३३ महिन्यांनी ‘अधिक मास’ येतो. म्हणून या महिन्यात सगळ्या गोष्टी तीस तीन या पटीत करतात.
३३ सकारात्मक संकल्प!
संकल्प असेच करावेत, जे आपल्याला पूर्ण करता येतील किंवा जे आपल्या आवाक्यात असतील. समाज माध्यमांवर एक छान मेसेज वाचला. त्यात हे ३३ संकल्प सुचवले होते. ‘जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्याशी सांगावे, सूज्ञ करून सोडावे सकळ जन’, या उक्तीप्रमाणे ते संकल्प लेखाच्या माध्यमातून देत आहे..
१) सदाचार २) सद्भावना ३) समयसूचकता ४) समयपालन ५) समंजसपणा ६) सात्त्विकता ७) सहजता (वागण्या-बोलण्यात) ८)सौजन्य ९) स्नेहभाव १०) स्वयंशिस्त ११) स्वाभिमान १२) सौम्यपणा १३) सुदृढता (शारीरिक व मानसिक) १४) सत्यवादित्व १५) संकल्प १६) संयम १७) स्मितहास्य १८) सदसद्विवेक १९) सत्संगती २०) समर्पणभाव २१) सरळपणा २२) सौंदर्यदृष्टी २३) सेवाभाव २४) सखोलज्ञान (विशेषत: आपल्या क्षेत्रात) २५) सरसत्व २६) सातत्य २७) समाधान २८) स्वावलंबन २९) सजगता ३०) सुसंस्कार ३१) सहनशीलता ३२) सकारात्मकता ३३) सद्गुरुसेवा
या सकारात्मक गोष्टी आत्मसात होण्यासाठी वेळ लागेल, परंतु अधिक मासाच्या मुहूर्तावर आपल्याला प्रयत्नांची सुरुवात नक्कीच करता येईल. अधिकस्य अधिकं फलम्’ मिळवायचे असेल, तर अधिक मेहनत लागणारच ना?
तीस तीन गोपद्म रांगोळी
अधिक मासात कोणत्याही दिवशी किंवा सलग महिनाभर ७,६,५, ,३,२,१ अशी गोपद्मांची चढत्या क्रमाने रांगोळी काढतात. इथेही तीस तीन संख्या आलीच. वास्तविक पाहता, संपूर्ण चातुर्मासात तीस तीन गोपद्मांची रांगोळी काढण्याची प्रथा आहे. त्याला गोपद्म व्रत असेही म्हणतात. गोपद्म हे चिन्ह रांगोळीत शुभ मानले जाते. गो पद्म अर्थात गायीच्या पावलांचा ठसा. त्याचे प्रतिकात्मक रूप रांगोळीत काढतात. भगवान महाविष्णूंना गाय अतिशय प्रिय आहे. कृष्णावतारात तर ते ‘गोपाल’ झाले होते. जे त्यांना प्रिय, तेच त्यांना समर्पण करण्याची भावना भाविकांच्या ठायी असते. तिच तीस तीन गोपद्म चातुर्मासात किंवा अधिक मासात देवघरासमोरील पाटावर साकारली जातात.
अधिक महिन्यात करावयाची कर्मे –
जावायाला, ब्राम्हणाला, गाईला वाण देणे, अधिक माहात्म्य वाचणे, आईची पुजा करुन आईची ओटी भरणे, देवालयांतील देवांना, गंगेला वाण देणे हे सर्व १८ जुलै ते १५ ऑगस्ट ह्या दरम्यांन करायचं आहे.
अधिक महिन्यांत दशमी, एकादशी, द्वादशी, पौर्णिमा ह्या विशेष तिथींना दान देण्याचं अधिक महत्त्व आहे.त्याच प्रमाणे पंचपर्व म्हणजेच वैधृती योग, व्यतिपात योग,अमावस्या, पौर्णिमा, द्वादशी तिथी हि पंचपर्व,त्यांची दानंही महत्त्वाची आहेत.
अधिक मासांत गंगास्नानाचंही तितकंच महत्त्व आहे. अनेकजण अधिक मासांत संपुर्ण महिनाभर गंगास्नान करतात. दान देतांना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक,बर्फी तसेच सप्तधान्याची दानं दिली जातात. अनारसे, बत्तासे ह्या सारख्या वस्तु ३३ नग ह्या प्रमाणांत देतात. या मागचे शास्त्रीय कारण आपण वर पहिलेच आहे.
दान शक्यतो तांब्याच्या पात्रांत द्यावे. तांब्याचे ताम्हण घेऊन त्यावर पळसाच्या पानाची पत्रावळ ठेवावी.त्या पत्रावळीवर थोडेसे गहु ठेवुन त्यावर दान द्यायची वस्तु ठेवावी. हळद-कुंकु वाहुन वस्तुवर तुळशी पत्र ठेवावं.त्यावर रुमाल,उपरणं झाकुन त्यावर दिपदान ठेवुन तुपाची वात लावावी. दान देणार्या व्यक्तीचं पुजन करुन यथाशक्ती प्रमाणे दान वस्तुवर दक्षिणा ठेवुन ते दान संबंधित व्यक्तिला द्यावे. वस्त्रदानही देता येते. अर्थातच,काय द्यावे? किती प्रमाणांत द्यावे? हा प्रत्येकाच्या इच्छाशक्तीचा व आर्थिकतेचा प्रश्न आहे. त्यामध्ये कोणतेही बंधन नाही. सक्ती नाही.
आईने केलेल्या कन्यादाना बद्दलची कृतज्ञता म्हणुन अधिक मासांत मुली आपल्या आईची साडी, खण-नाराळाने ओटी भरतात.
अधिक मासांत विष्णु स्वरुप देवतांचं विशेषतः कृष्णाचं महत्त्व जास्त असल्यांने कृष्णाला महिनाभर तुळस वाहणे, दररोज थोडासा लोण्याचा नैवैद्य दाखवुन तो एका लहान बाळ-गोपाळाला देणे असे अनेक उपक्रम करता येतात. तसेच, श्रावणांतील व्रत-वैकल्य, सोमवार व इतर उपवास, पारायण वाचन हे सगळं १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ ह्या दरम्यांन करायचे आहे.
(क्रमश:)
विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७