अधिक मास विशेष (भाग – ४)
अधिक मासात एकभुक्त का राहावे?
अधिकमासाच्या अधिक कथा
अधिकमासाचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा पोथीपुराणात आहेत. गुणसुंदरी आणि द्रौपदीच्या कथा जशा आहे, तशीच आणखी सौभाग्य नगरीतील चंद्रकला राणीची कथा आहे. तिनं आपल्या पूर्वजन्मी अधिकमासात दिपपुजा पूर्व नियमाप्रमाणे केली म्हणुन तिला पुढील जन्मी राणी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.
इंद्रलोकाची एक अप्सरा स्मितविलासीनी तिनं एकदा चुकून दुर्वासमुनींच्या गळ्यात हार टाकला, ते रागावले, त्यांच्या शापामुळे ती अप्सरा पिशाच्च झाली. नंतर कुमारी क्षेत्रातील एका तपस्विनीनं अधिकमासातील सर्वपुण्य तिला दिलं त्यामुळे तिचा उध्दर झाला.
कदर्य नावाच्या एका गृहस्थाने दुसऱ्याच्या बागेमधील फळे चोरून खाल्ली, म्हणुन तो पुढील जन्मी वानर झाला. मृगतीर्थ नावाच्या तळ्याकाठी झाडावर तो होता, एके दिवशी या झाडावरून त्या झाडावर उडी मारतांना तो त्या तळ्यात पडला त्याला ते स्नान अधिकमासात सहज घडलं त्या पुण्याईमुळं त्याला स्वर्गलोक प्राप्त झालं.
अवंतीपुरच्या मुग्ध आणि रूपवती या दोन जावा पण त्यांच्यात हेवादावा एकीने दुसरीला अधिकमासात मलिनपणाने व्रत करण्यास सांगितले, तिने ते मनोभावानं केले. तिला मुरलीधर पुरूषोत्तम प्रभु प्रसन्न झाले, पहिलीला पश्चाताप झाला. याप्रकारे कळत-नकळत जरी अधिकमासात आपल्या हातून कोणतंही पुण्यकर्म घडलं तरी भगवान मुरलीधर त्या भाविकाचं कल्याण करतात. विश्वास ठेवून सर्वांनी अधिकमासात पुण्य कर्म करावं.
यंदा श्रावणाआधी अधिक श्रावण मास आला आहे. त्यालाच “मलमास’ किंवा ‘पुरुषोत्तम मारत असेही प्रामुख्याने म्हटले जाते. मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात, सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने मलमासाने भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या ‘अधिक मासाला’ भगवान विष्णूंच्या नावे “पुरुषोत्तम मास असेही संबोधिले जाते. यंदा १८ जुलै ते १६ ऑगस्ट अधिक श्रावण असणार आहे. त्यानिमित्ताने विविध प्रकारचे संकल्प केले जातात. या लेखात एकभुक्त व्रताची माहिती जाणून घेऊ .
एकभुक्त राहणे, म्हणजे दिवसभरातून एकवेळ जेवणे. मुख्यत: चातुर्मासात अनेक जण एकभुक्त राहणे पसंत करतात. मात्र, अधिक मासात एकभुक्त व्रत अंगिकारले, तर ते अधिक फलदायी ठरते, असे हिंदू पंचांगामध्ये लिहिले आहे.
अलीकडच्या काळात, आपण ज्याला ‘डाएट’ म्हणतो, किंवा आयुर्वेदातील परिभाषेनुसार ‘लंघन’ म्हणत तीच सोय धर्मशास्त्राने व्रत-वैकल्यांच्या नावे करून ठेवली आहे.
एकभुक्त व्रतामागील हेतू.
चातुर्मासातील आषाढ, श्रावण, भाद्रपद या तीन महिन्यांत आपल्या देशात पावसाळा असतो. यावेळी पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे शरीराला व पचनसंस्थेला विश्रांती मिळणे, असा एकभुक्त राहण्यामागे हेतू असतो. या तीन पावसाळी महिन्यांना जोडूनच अधिक श्रावण मास आल्यामुळे आपल्यालाही एकभुक्त राहून आरोग्य व आध्यात्म यांचा मेळ घालता येईल.
मनावर नियंत्रण :
‘कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है।’ असे म्हणतात. अधिक मासाचे फळ मिळावे, असे वाटत असेल, तर अन्नावरील वासना कमी करून आपल्या दैनंदिन कार्यात, पूजे-अर्चेत मन रमवावे, यासाठी हे एकभुक्त व्रत करता येईल. त्यामुळे आपोआपच मनावर नियंत्रण येते आणि त्याग भावना बळावते.
जाणिजे यज्ञकर्म:
जेवायला बसताना आपण एक श्लोक म्हणतो. ‘वदनी कवळ घेता. त्या श्लोकाच्या शेवटी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म! म्हणजेच अन्नग्रहण करताना भगवंताचा आठव करा आणि त्याच्या कृपेने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे. याबद्दल त्याचे आभार माना. शिवाय, जे अन्न ग्रहण करत आहात, ते पोटाची किंवा मनाची तृप्ती व्हावी यासाठी नाही, तर हा एक यज्ञ आहे असे समजा आणि अन्न ही त्या यज्ञातील आहुती समजून, गरज आहे तेवढेच ग्रहण करा. तरच, त्या अन्नाचे ऊर्जेत रुपांतर होऊन, ती ऊर्जा दिवसभरात चांगल्या कामासाठी वापरली जाईल.
पोषणकर्ता महाविष्णूंना एकवेळचे जेवण समर्पित :
सृष्टीचालक भगवान महाविष्णूंना मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व जीव-जीवांचे पोषण करायचे असते. त्यांच्या या महत्कार्यात आपला खारीचा वाटा, या भावनेने आपण एकभुक्त राहून आपल्या वाट्याचे एकवेळचे जेवण गरजू व्यक्तीला द्यावे. किंवा एकवेळच्या जेवणाचा शिधा (कोरडे धान्य, तांदूळ, पीठ, तेल, मीठ) द्यावे. एवढ्याशा सेवेने कोणा गरजूचे आशीर्वाद मिळाले, तर ती सेवा भगवान महाविष्णूंच्या चरणी रुजू झाली असे समजावे.
(क्रमश:)
-संकलन : विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७