अधिक मास विशेष (भाग ३)
बोनस रूपी अधिक महिन्याचा सदुपयोग कसा करावा?
द्रौपदीच्या मागील जन्माची कहाणी!
अधिक महिन्याच्या अनेक कथा पौराणिक ग्रंथांत आढळतात. यांत पांडव आणि द्रौपदी यांची कथा विशेष प्रसिद्ध आहे.पांडव वनवासात असतांना त्यांचे खूप हाल होत होते. एके दिवशी ते श्रीकृष्णाला म्हणाले, भगवंता, तुम्ही आमचे रक्षण कराल, तुम्हाला आमचे हे हाल पहावतात का ? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुमच्या या अवस्थेला मी करणार तरी काय? हे तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ आहे, ते तुम्हाला भोगावेच लागणार. तुमच्या धृतक्रीडेमुळे जुगारात तुमचे राज्य वैभव गेले आणि तुमच्या नशिबी हा वनवास आला आणि त्याच्यात द्रौपदी द्वारा मागील जन्मी घडलेला अपराध त्यामुळं तिला सुध्दा हे भोगावं लागत आहे.
द्रौपदीचा अपराध? हे ऐकून पांडवांनी श्रीकृष्णाला आश्चर्याने विचारले, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही ऐका. मागच्या जन्मी ही द्रौपदी मेधावी, नावाच्या एका ब्राह्मणाची कन्या होती. बालपणीच तिची आई वारली. तेव्हा वडिलांनीच तिला लहानाचे मोठे केले. तिचं लग्न होण्याच्या पूर्वीच तो ब्राह्मणसुध्दा वारला. नंतर त्या कन्या मेधावतीनं भगवान शंकराची आराधना केली. तिची आराधना चालु असतांनाच तेथे ऋषी दुर्वास आले. आणि तिला म्हणाले, पुत्री तू अधिकमासातील व्रत कर. भगवान पुरुषोत्तमाची पुजा कर. तेव्हा तुला उत्तम वर लामेल, तेव्हा मेधावती म्हणाली, ऋषीवर ती भगवान शंकराची आराधना करीत आहे. त्या महादेवापुढे पुरुषोत्तमाची काय महती?
तेव्हा ऋषी दुर्वास रागावून म्हणाले, पुत्री तू पुरूषोत्तमाला कमी समजतेस, अधिकमास व्रताला तुच्छ समजतेस, याचा परीणाम तुला पुढच्या जन्मी भोगावा लागेल, हा तुला माझा शाप आहे. ऋषी दुर्वास इतकं म्हणून तेथून निघून गेले. तेव्हा मेधावतीला पश्चाताप झाला, पण त्याचा उपयोग आता काय ? पुढं ती मेधावती या जन्मी द्रौपदी झाली आणि आपल्या मागील जन्माची शिक्षा भोगत आहे.
तेव्हा पांडव म्हणाले, झालं ते पावलं आता आम्ही पुढं काय करावं ते तुम्ही आम्हाला सांगावं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही अधिक मासातील व्रत नियम व पुरुषोत्तमाची सेवा करायची त्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्म केली, आणि नंतर त्यांना त्यांच राज्य मिळून ते सुखी समाधानी झाले.
असा हा अधिक मास बोनस च्या रुपांत आपल्याला प्राप्त झाला आहे. यंदा १८ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत अधिक मास असणार आहे. त्यालाच ‘मलमास’ किंवा ‘पुरुषोत्तम मास’ असेही प्रामुख्याने म्हटले जाते. हा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात, सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने ‘मलमासाने’ भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या ‘अधिक मासाला’ भगवान विष्णूंच्या नावे ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हटले जाते.
दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाचे खगोलशास्त्रीय गणित काय ?
पौराणिक ग्रंथांनुसार दर तीन वर्षांनी अधिकमास येतो. चैत्रापासून फाल्गुनापर्यंत १२ महिन्यात ३५५ दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस ३६५ असतात. हे १० दिवस तीन वर्षांनी ३० दिवस झाल्यावर एक महिना अधिक घालून ते पुन्हा सारखे होतात. म्हणजे, दर ३३ महिन्यांनी ‘अधिक मास’ येतो.
सूर्य वर्षातील १२ राशींपैकी प्रत्येक महिन्यात एकेक रास बदलतो. प्रत्येक राशीत सूर्य जातो, त्याला संक्रांत म्हणतात. मेष राशीपासून मीन राशीपर्यंत एका वर्षांत १२ संक्रांती होतात. चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत १२ महिन्यांत प्रत्येक एका महिन्यात संक्रांत असते. यात बदल होत होत ३३ महिन्यांनी असा महिना येतो, की त्यात संक्रांत नसते. अलीकडच्या महिन्यात अमावस्येला संक्रांत असते आणि पुढील महिन्यात प्रतिपदेला संक्रांत येते. त्या बिन संक्रांतीच्या महिन्याला अधिक महिना म्हणतात. अधिक महिन्याला पुढच्या महिन्याचे नाव देतात. जसे, यंदा श्रावण महिना आल्याने अधिक श्रावण मास असे म्हटले जाईल.
चैत्र ते अश्विन या महिन्यांमध्ये अधिक मास येतो. मार्गशीर्ष, पौष, माघ या महिन्यात अधिक मास येत नाही. पण, फाल्गुनात क्वचित येऊ शकतो. यावरून आपल्याला पूर्वजांच्या सखोल अभ्यासाचा अंदाज येऊ शकतो.
अधिक मास अर्थात ‘बोनस महिना’.
शाळेत पेपर संपता संपता, परिक्षकांनी १० मिनिटांचा अवधी वाढवून दिला, तर जो आनंद होतो, तोच आनंद अधिक मासातून मिळवण्याचा प्रयत्न करता येईल. हा कालावधी धार्मिक अनुष्ठानासाठी वापरून पुण्यसंचय करता येईल. साक्षात भगवान महाविष्णूंनी या मासाची जबाबदारी घेतल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शना खाली या महिन्यातील व्यवहार चालणार आहेत, याची नोंद घ्यावी.
या महिन्यात हे करा
>> हाताने काम आणि मुखाने नाम घेत, सत्कार्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी,
>> या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी, पूजा पाठ करावेत.
>> स्तोत्रपठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून अधिक मासात अधिकाधिक स्तोत्रपठण करून सकारात्मकता वाढवावी.
>> अधिक मासात गरजवंताला यथाशक्ती दानधर्म करावा. सामाजिक संस्थांमध्ये सेवा, शुश्रुषा करावी. अशी सेवा देवाच्या पायाशी चटकन रूजू होते..
>> मन विषयांमध्ये न गुंतवता, शक्य तेवढे हरिनाम घेऊन आपली दैनंदिन कामे पार पाडावीत.
अधिक मासात काय करू नये?
वर म्हटल्याप्रमाणे, हा महिना बोनस मिळाला आहे. त्याचा वापर काटेकोरपणे केला पाहिजे. तरच या अधिक महिन्याची बचत होऊन भविष्यात त्याचे व्याज मिळवता येईल.
>> लग्न, कार्ये, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतीही मंगल कार्ये अधिक मासात करू नयेत. फार तर, या समारंभाचे मुहूर्त या मासात निश्चित करता येतील.
> गृहखरेदी, वास्तुखरेदी, वाहन खरेदी इ. मोठी आर्थिक गुंतवणूक असलेल्या गोष्टी अधिक मासात करु नये, मात्र, त्यासंबंधी बोलणी या मासात पार पाडता येतील,
>> नवीन ठिकाणी देवदर्शनाला न जाता, आपल्या नेहमीच्या मंदिरातील देवाची किंवा देव्हाऱ्यातील देवाची पूजा करावी.
आपल्या पूर्वजांनी अतिशय विचार पूर्वक अधिक मास सुरु केला आहे. दर ३ वर्षानी येणार्या या बोनस रूपी अधिक महिन्यापासून आपण काय शिकणार?
अधिक मासांत शरीराला थोडा ताण पडेल, मनाला थोडे आवरावे लागेल अशी व्रते केल्याने आपली इच्छाशक्ती वाढते. व्रत आणि नेम मन व शरीराला काही चांगल्या सवयी लावण्यासाठी दिलेल्या प्रथा आहेत, असे आपण म्हणू शकतो.
आजच्या भाषेत सांगायचे, तर हा नवीन सवयी लावून घेण्यासाठी दिलेला अधिक वेळ आहे. एखादी गोष्ट महिनाभर न चुकवता केली, तर ती सवयीची होते, असे पाश्चात्त्य प्रशिक्षक कळकळीने सांगतात. तीच सोय अधिक मासाच्या व्रताने करून दिली आहे. दर अधिक मासात काही नवीन व्रत धरावे, ते मनोभावे पाळावे आणि मग जन्मभर सवय म्हणून अंगीकारावे हेच त्या व्रताचे माहात्म्य आहे.
(क्रमश:)
संकलन: विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७