नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): येथील आधाराश्रम संस्थेतील एक बाळ ( मुलगा) काल अमेरिकेतील दाम्पत्याला दत्तक देण्यात आले. अद्वैत जन्मत: कर्णबधिर आहे. काल झालेल्या ह्रदयस्पर्शी दत्तक कार्यक्रमात नव्या पालकांचे अश्रू बोलके होते तर चिमुकल्या अद्वैतचे अमेरिकन पालकांशी ऋणानुबंध जुळल्याचे उपस्थितांनी अनुभवले.
या दत्तक सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लँड डेव्हलपर प्रा.जयंत भातांब्रेकर, सौ.दीपा भातंब्रेकर, अद्वैतवर उपचार करणारे राहुल वैद्य, सौ. वैद्य, सक्षम विकलांग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष अनिल खांडकेकर, सचिव मुकुंद रामदासी उपस्थित होते. प्रारंभी आधाराश्रमाचे अध्यक्ष प्रभाकर केळकर यांनी स्वागत केले. ते म्हणाले, आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त बालके देशभरातील पालकांना दत्तक देण्यात आली असून ७३ वे बाळ, परदेशी पालकांच्या हाती सुपूर्द करण्याचा क्षण आहे. संस्थेचे सल्लागार मिलिंद दातार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
दत्तक प्रक्रिया समन्वयक राहुल जाधव यांनी प्रास्ताविक केले. २७ दिवसांचा अद्वैत आधाराश्रमात दाखल झाला. तेव्हाच तो कर्णबधिर असल्याचे लक्षात आले. अमेरिकेतील फॉर्टिअर दांपत्याने संपर्क साधल्यावर ६ महीन्यात दत्तक प्रक्रिया पूर्ण झाली. त्यांनी पहिली मुलगी भारतातूनच दत्तक घेतली असून ती देखील कर्णबधिर होती. प्रा.जयंत भातंब्रेकर म्हणाले, वैद्य आण्णाशास्त्री दातार यांनी दूरदृष्टीने १९५४ साली स्थापन केलेली आधाराश्रम ही संस्था सक्षमपणे सुदृढ समाजस्वास्थ्य जपत आहे. येथील पदाधिकारी चालक नव्हे तर पालक म्हणून काळजी घेतात. कर्मचारी मायेच्या ममतेने संगोपन करतात. असे सांगून त्यांनी देणगी दाखल धनादेश दिला.
राहुल वैद्य म्हणाले, अद्वैतवर पुढील शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असून लवकरच ती त्याचे जोसेफ व अंबर फॉर्टिअर हे नवे पालक अमेरिकेत करणार आहेत. खांडकेकर म्हणाले, सक्षम संस्थेला अद्वैतसाठी मदतीचा हात देण्याची संधी मिळाली. यापुढेही आधाराश्रम संस्थेबरोबर समन्वयाने काम केले जाईल. आधाराश्रमाच्या सचिव कल्याणी दातार यांनी अद्वैत व त्याच्या पालकांना औक्षण केले. दीपा भातांब्रेकर यांनी बाळ नव्या पालकांच्या हाती सुपुर्द केले. सचिव हेमंत पाठक यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. यावेळी पदाधिकारी, इतर मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते.