नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -देशातील नागरिक आधारचा मोठ्या प्रमाणावर वापर आणि स्वीकार करत असल्याचे दिसून आले आहे. ऑगस्ट महिन्यात आधारच्या माध्यमातून २१९ कोटी ७१ लाख प्रमाणीकरण व्यवहार करण्यात आले; जुलै २०२२ च्या तुलनेत या प्रमाणात ४४ टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. यावरून आधारमुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सोपे होत असल्याचे अधोरेखित होते.
यापैकी बहुतांश व्यवहार बोटांचे ठसे घेवून बायोमेट्रिक प्रमाणीकरण (१२८.५६ कोटी) वापरून केले आहेत. त्या खालोखाल भौगोलिक प्रमाणिककरण आणि ओटीपी प्रमाणिकरणाचा वापर करण्यात आला. ऑगस्ट २०२२ अखेरपर्यंत आधार प्रमाणीकरणांची एकूण संख्या ८०७४.९५ कोटी इतकी झाली आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस ही एकूण संख्या ७८५५.२४ कोटी इतकी होती.
ऑगस्ट महिन्यात आधारव्दारे झालेल्या ई-केवायसी व्यवहारांची संख्या २३.४५ कोटी आहे. जुलै महिन्यातील एकूण ई-केवायसी व्यवहारांची संख्या १२४९.२३ कोटी इतकी होती, ती वाढून, ऑगस्टअखेरपर्यंत १२७२.६८ कोटी इतकी झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात नागरिकांनी १.४६ कोटी आधार यशस्वीपणे अद्ययावत केले आणि नागरिकांच्या विनंतीनुसार आतापर्यंत ६५.०१ कोटी आधार क्रमांक अद्ययावत करण्यात आले आहेत. त्याशिवाय आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (एईपीएस) च्या माध्यमातून आणि मायक्रो एटीएम जाळ्याच्या माध्यमातून १,५२८.८१ कोटी बँकिंग व्यवहार झाले आहेत. यापैकी सुमारे २२ कोटी व्यवहार एकट्या ऑगस्ट महिन्यात झाले आहेत. यामुळे तळागाळातील लोकांना आर्थिक समावेशनाच्या कक्षेत समाविष्ट करणे शक्य झाले आहे.