बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून केले हे भाषण

by Gautam Sancheti
ऑगस्ट 14, 2021 | 9:20 pm
in राष्ट्रीय
0
ramnath kovind

माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार !
देश-परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत हर्षोल्हासाचा दिवस आहे. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाचं एक विशेष महत्त्व आहे, कारण याच वर्षी आपण सर्व,आपल्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीच्या निमित्तानं, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या ऐतिहासिक क्षणी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! स्वातंत्र्यदिन आपल्यासाठी पारतंत्र्यातून मुक्ततेचा सण आहे. पिढ्यानुपिढ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संघर्षामुळे आपलं स्वातंत्र्याचं स्वप्न साकार झालं होतं. त्या सर्वांनी, त्याग आणि बलिदान यांची अनोखी उदाहरणं सर्वांसमोर ठेवली. त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या जोरावरच आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहोत. मी त्या सर्व अमर स्वातंत्र्यसैनिकांच्या पवित्र स्मृतींना श्रद्धेनं वंदन करतो.

अनेक देशांप्रमाणेच आपल्या देशालाही परकीय राजवटीत खूप अन्याय आणि अत्याचार सहन करावे लागले. पण भारताचं वैशिष्ट्य असं होतं की गांधीजींच्या नेतृत्वात आपली स्वातंत्र्य चळवळ, सत्य आणि अहिंसेच्या सिद्धांतावर आधारलेली होती. गांधीजी आणि इतर सर्व राष्ट्रीय नेत्यांनी भारताला वसाहतवादी शासनाच्या जोखडातून मुक्त करण्याचा मार्ग तर दाखवलाच, सोबत राष्ट्राच्या पुनर्निर्माणाची रूपरेषाही मांडली. त्यांनी भारतीय जीवनमूल्य आणि मानवी प्रतिष्ठेला पुनर्स्थापित करण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले.

आपल्या प्रजासत्ताकाच्या या ७५ वर्षांच्या वाटचालीवर जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपण प्रगतीच्या मार्गावर खूप मोठा पल्ला गाठला आहे. गांधीजींनी आपल्याला हे शिकवलंय की चुकीच्या दिशेनं वेगात पावलं टाकण्यापेक्षा, योग्य दिशेनं हळूहळू का होईना पण जपून पावलं पुढे टाकायला हवीत. अनेक परंपरांनी समृद्ध अशा भारताच्या सर्वात मोठ्या आणि चैतन्यपूर्ण लोकशाहीच्या अद्वितीय यशाकडे जागतिक समुदाय आदरानं पाहतो.

नुकत्याच झालेल्या टोक्यो ऑलिंपिक मध्ये आपल्या खेळाडूंनी आपल्या शानदार कामगिरीनं देशाचा मान वाढवला आहे. भारतानं ऑलिंपिक मधल्या आपल्या सहभागाच्या १२१ वर्षांमध्ये सर्वाधिक पदकं जिंकण्याचा इतिहास या खेपेस रचला आहे. आपल्या मुलींनी अनेक अडचणींवर मात करत खेळाच्या मैदानात जागतिक दर्जाचं प्रभुत्व मिळवलं आहे. खेळा सोबतच जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात, महिलांचा सहभाग आणि यशात, महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. उच्च शिक्षणसंस्थां पासून सशस्त्र दलां पर्यंत, प्रयोगशाळांपासून खेळाच्या मैदानांपर्यंत, आपल्या मुली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. मुलींच्या यशात मला भविष्यातल्या विकसित भारताची झलक दिसते आहे. मी प्रत्येक माता-पित्यांना विनंती करतो की अशा होतकरु मुलींच्या कुटुंबांकडून काही शिकत, आपापल्या मुलींनाही प्रगतीच्या वाटा खुल्या कराव्या.

गेल्या वर्षाप्रमाणे, या महासाथी मुळे यावर्षीही स्वातंत्र्यदिन समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे करणं शक्य होणार नाही. मात्र आपल्या सर्वांची अंत:करणं नेहमीप्रमाणेच उत्साहानं ओथंबलेली आहेत. महासाथीची तीव्रता कमी झालेली असली तरी कोरोनाविषाणूचा प्रभाव अजूनही संपलेला नाही. या वर्षी आलेल्या महासाथीच्या दुसऱ्या लाटेच्या विनाशकारक प्रभावातून आपण अजूनही सावरु शकलेलो नाही. गेल्यावर्षी सर्वांच्या असामान्य प्रयत्नांच्या जोरावर आपण संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरलो होतो. आपल्या वैज्ञानिकांनी खूप कमी वेळात लस तयार करण्याचं कठीण काम केलं. त्यामुळेच या वर्षाच्या सुरुवातीला आपण सर्वजण एका विश्वासानं आश्वस्त होतो कारण आपण इतिहासातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली होती. तरीही विषाणूची नवी रूपं आणि इतर अकल्पित कारणांमुळे आपल्याला दुसऱ्या लाटेचा भयावह प्रकोप सहन करावा लागला. मला या गोष्टीचं खूप दुःख वाटतं की दुसऱ्या लाटेत बऱ्याच जणांचे प्राण वाचवता येऊ शकले नाहीत आणि अनेक लोकांना खूप अडचणी सहन कराव्या लागल्या. हा अभूतपूर्व संकटाचा काळ होता. मी संपूर्ण देशाच्या वतीनं आपल्या सर्व पिडीत कुटुंबांच्या दुःखात बरोबरीनं सहभागी आहे.

हा विषाणू एक अदृश्य आणि बलशाली शत्रू आहे, ज्याचा विज्ञानाच्या सहाय्यानं, प्रशंसनीय लक्षणीय वेगानं सामना केला जात आहे. आपल्याला या गोष्टीचं समाधान वाटतं की या महासाथीत आपण जेवढ्या लोकांचे जीव गमावले आहेत, त्यापेक्षा अधिक लोकांचे जीव वाचवू शकलो आहोत. पुन्हा एकदा आपण आपल्या सामूहिक संकल्पाच्या जोरावर ही दुसरी लाट ओसरताना पहात आहोत. सर्व प्रकारची जोखीम पत्करुन आपले डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, प्रशासक आणि इतर कोरोना योद्धे करत असलेल्या प्रयत्नांमुळे कोरोनाच्या दुसरा लाटेवर नियंत्रण मिळवलं जात आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे आपल्या सार्वजनिक आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांवर खूप मोठा ताण आला आहे. खरी गोष्ट अशी आहे की विकसित अर्थव्यवस्थांसह कुठल्याही देशाच्या पायाभूत सुविधा, या भयानक संकटाचा सामना करण्यात समर्थ ठरलेल्या नाहीत. आपण आरोग्य व्यवस्थेला भक्कम बनवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. देशाच्या नेतृत्वानं या आव्हानाचा कसून सामना केला. केंद्र सरकारच्या प्रयत्नांसोबतच, राज्य सरकारं, खाजगी क्षेत्रातल्या आरोग्य सुविधा, स्वयंसेवी संस्था आणि इतर सामाजिक गटांनीही आपलं सक्रिय योगदान दिलं. या असामान्य अभियानात, भारतानं ज्याप्रमाणे अनेक देशांना औषधं, उपकरणं आणि लसी पाठवल्या, त्याचप्रमाणे अनेक देशांनीही उदारपणे जीवनावश्यक वस्तू, आपल्याला पाठवल्या. या मदतीबद्दल मी जागतिक समुदायाचे आभार मानतो.

या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून खूप मोठ्या प्रमाणात स्थिती पूर्वपदावर येत आहे आणि आपले बहुतांश देशबांधव सुटकेचा निश्वास सोडत आहेत. आतापर्यंतच्या अनुभवातून हीच शिकवण मिळते की आता आपल्या सर्वांना, सातत्यानं सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. सध्या लसच आपल्या सर्वांसाठी, विज्ञानानं उपलब्ध करून दिलेलं, सर्वात सोपं आणि सर्वोत्तम सुरक्षाकवच आहे. आपल्या देशात सुरू असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ५० कोटीं पेक्षा जास्त देशवासीयांचं लसीकरण झालं आहे. मी सर्व देशवासियांना आग्रह करतो की त्यांनी उपलब्ध व्यवस्था आणि नियमांनुसार, लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं आणि लसीकरणासाठी दुसऱ्यांनाही उद्युक्त करावं.

या महासाथीचा परिणाम अर्थव्यवस्थेसाठीही तितकाच विनाशकारक आहे जेवढा लोकांच्या आरोग्यासाठी विनाशकारक ठरला आहे. सरकार गरीब आणि कनिष्ठ मध्यम वर्गाच्या लोकांसोबतच छोट्या आणि मध्यम उद्योगांच्या समस्यांबाबतही चिंताक्रांत आहे. सरकार, लॉकडाऊन आणि, प्रवास तसच वाहतुकीवरील प्रतिबंधांमुळे अनेक अडचणींचा सामना कराव्या लागलेल्या, श्रमिक आणि व्यावसायिकांच्या गरजा भागवण्याबाबत संवेदनशील राहिलं आहे. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारनं गेल्या वर्षी त्यांना मदत पोहोचवण्यासाठी वेळीच पावलं उचलली होती. या वर्षीसुद्धा सरकारनं, मे आणि जूनमध्ये सुमारे 80 कोटी लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून दिलं. आता हा मदतीचा कालावधी दिवाळीपर्यंत वाढवला आहे. याशिवाय कोविडच्या प्रभावामुळे मेटाकुटीला आलेल्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं नुकतीच 6 लाख 28 हजार कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजची सुद्धा घोषणा केली आहे. एक गोष्ट विशेष समाधानकारक आहे की वैद्यकीय सुविधांची उपलब्धता अधिकाधिक वाढवण्यासाठी एका वर्षभरातच तेवीस हजार दोनशे वीस कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.

मला या गोष्टीचा आनंद वाटतो की सर्व प्रकारच्या अडचणी असूनही ग्रामीण भागात, विशेष करून कृषी क्षेत्रात वृद्धी कायम आहे. नुकतच, कानपुर ग्रामीण जिल्ह्यात असलेल्या माझ्या वडिलांच्या परौंख या गावी दिलेल्या भेटीदरम्यान, ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवन सुकर बनवण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत हे पाहून, मला खूप बरं वाटलं. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये असलेलं मानसिक अंतर आता पूर्वीपेक्षा खूप कमी झालं आहे. मुळात भारत हा गावांमध्येच वसलेला आहे. त्यामुळे त्यांना विकासाच्या बाबतीत मागे ठेवून चालणार नाही. म्हणूनच, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सह, आपल्या शेतकरी बंधू-भगिनीं साठी विशेष योजना राबवण्यावर भर दिला जात आहे.

हे सर्व प्रयत्न आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी भारताच्या संकल्पनेनुसारच आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेत जन्मजात असलेल्या विकासाच्या क्षमतेवर गाढ विश्वास ठेवत, सरकारनं, संरक्षण, आरोग्य, नागरी हवाई वाहतूक, विद्युत आणि इतर क्षेत्रांमधली गुंतवणूकीची प्रक्रिया आणखी जास्त सोपी केली आहे. सरकारकडून होत असलेल्या, पर्यावरण स्नेही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना, विशेष करून सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी होत असलेल्या नवनव्या प्रयत्नांचं, जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. जेव्हा, ईज ऑफ डुईंग बिजनेस म्हणजेच व्यवसाय स्नेही वातावरणाच्या दर्जात सुधारणा होते, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम देशवासीयांच्या ईज ऑफ लिव्हींग म्हणजेच दैनंदिन जीवनमानाच्या सुरळीतपणावरही होतो. याशिवाय लोककल्याणाच्या योजनांवरही विशेष भर दिला जात आहे. उदाहरणार्थ ७० हजार कोटी रुपयांच्या क्रेडिट लिंक्ड सबसिडी म्हणजेच कर्जसहाय्य योजनेमुळे आपलं स्वतःचं घर असण्याचं स्वप्नं आता साकार होत आहे. कृषी विपणनासाठी केलेल्या अनेक सुधारणांमुळे आमचे अन्नदाता शेतकरी अधिक सामर्थ्यशाली होतील आणि त्यांना आपल्या उत्पादनांचं आणखी चांगलं मूल्य मिळेल. सरकारनं प्रत्येक नागरिकाच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत, त्यातल्या काहींचाच मी उल्लेख केला आहे.

आता जम्मू-काश्मीरमध्ये नवजागृती दिसून येत आहे. सरकारनं, लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांसोबत विचारविनिमयाची प्रक्रिया सुरू केली आहे. मी जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना, विशेष करुन युवावर्गाला, या संधीचा लाभ उठवण्याची आणि लोकशाही संस्थांच्या माध्यमातून आपल्या इच्छापूर्तीसाठी कामाला लागण्याची विनंती करतो.सर्वांगीण विकासाच्या दृश्य परिणामांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढत आहे. या बदलामुळे, प्रमुख जागतिक राष्ट्र गटांमध्ये असलेला आपला सहभाग,अधिक प्रभावी होत आहे, तसंच अनेक देशांशी असलेले आपले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होत आहेत.

७५ वर्षांपूर्वी जेव्हा भारतानं स्वातंत्र्य मिळवलं, तेव्हा भारतात लोकशाही यशस्वी होईल की नाही याबाबत अनेक लोक साशंक होते. या लोकांना एक वास्तव कदाचित माहीत नव्हतं की प्राचीन काळात लोकशाहीची मूळं, याच भारत भूमीत खोलवर रुजली होती, फोफावली होती. आधुनिक युगातही भारत, कुठल्याही भेदभावाविना, वयोमर्यादेनुसार पात्र सर्व नागरिकांना मताधिकार देण्यात अनेक पाश्चिमात्य देशांच्याही पुढे राहिला आहे. आमच्या राष्ट्र निर्मात्यांनी जनतेच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवला आणि आपण सर्व भारतवासीय आपल्या देशाला एक बलशाली लोकशाही बनवण्यात यशस्वी ठरलो आहोत.

आपली लोकशाही, संसदीय व्यवस्थेवर आधारलेली आहे. त्यामुळे संसद, आपल्या लोकशाहीचं मंदिर आहे. इथे जनतेच्या सेवेसाठी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर वाद-प्रतिवाद, संवाद करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी एक सर्वोच्च व्यासपीठ आपल्याला उपलब्ध आहे. ही आपल्या संपूर्ण देशासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे की आपलं लोकशाहीचं हे मंदिर येत्या काळात, लवकरच एका नव्या वास्तूत स्थापन होणार आहे. ही नवी वास्तू आपली रीत आणि धोरण व्यक्त करेल. यामध्ये आपल्या वारशाबाबत सन्मानाची भावना असेल आणि सोबतच समकालीन जगाच्या खांद्याला खांदा लावून चालण्याच्या कौशल्याचं दर्शनही असेल. स्वातंत्र्याच्या 75 व्या वाढदिवशी, या नव्या वास्तूचं उद्घाटन म्हणजे, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या विकास प्रवासाचा एक ऐतिहासिक आरंभ बिंदू मानला जाईल.

सरकारनं या विशेष वर्षाला संस्मरणीय बनवण्यासाठी कितीतरी योजनांचा शुभारंभ केला आहे. गगनयान मोहिमेचं या योजनांमध्ये एक विशेष महत्त्व आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुदलाचे काही वैमानिक, परदेशात प्रशिक्षण घेत आहेत. ते जेव्हा अंतराळात उड्डाण करतील, तेव्हा भारत, मानवयुक्त अंतराळ मोहीम यशस्वी करणारा जगातला चौथा देश ठरेल. अशाप्रकारे आमच्या मनोरथांना कुठल्याही प्रकारच्या मर्यादांचं बंधन राहणार नाही. असं असलं तरीही आमचे पाय वास्तवाच्या भरभक्कम जमिनीवर ठाम उभे आहेत. आपल्याला याची पूर्ण जाणीव आहे की स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्नं साकारण्याच्या दिशेनं आपल्याला अजूनही खूप पुढे जायचं आहे. ही स्वप्नं आपल्या राज्यघटनेत, न्याय-स्वातंत्र्य-समता आणि बंधुत्व या चार अर्थपूर्ण शब्दांद्वारे स्पष्टपणे जतन केली आहेत. विषमतेनं भरलेल्या जागतिक व्यवस्थेत आणखी मोठ्या प्रमाणावर समता आणण्यासाठी, तसंच अन्याय्य परिस्थितीत जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्यासाठी, ताकदीनिशी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. न्यायाची संकल्पना खूप व्यापक झाली आहे आणि तिच्यात आर्थिक तसच पर्यावरणाशी संबंधित न्याय सुद्धा समाविष्ट आहे. पुढची वाटचाल वाटते तितकी सोपी नाहीये. आपल्याला कितीतरी जटील आणि कठीण टप्पे ओलांडायचे आहेत. मात्र आपल्या सर्वांना असामान्य असं मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध आहे. हे मार्गदर्शन विविध स्रोतांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतं. शतकानुशतकां पूर्वींच्या ऋषी-मुनीं पासून आधुनिक युगातले संत आणि राष्ट्रनायकांपर्यंत, आपल्या मार्गदर्शकांच्या अत्यंत समृद्ध परंपरेची ताकद आपल्या जवळ आहे. विविधतेत एकतेच्या भावनेच्या जोरावर, आपण मजबुतीनं, एक राष्ट्राच्या रूपात पुढे जात आहोत.

वारशानं मिळालेली आपल्या पूर्वजांची जीवनविषयक दृष्टी, या शतकात केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी मदतगार सिद्ध होईल. आधुनिक औद्योगिक संस्कृतीनं मानवजातीसमोर गंभीर आव्हानं उभी केली आहेत. समुद्रांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. हिमनद-हिमकडे वितळत आहेत आणि पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. याच प्रमाणे हवामान बदलाची समस्या आपल्या जीवनावर परिणाम करत आहे. आपल्यासाठी अभिमानाची बाब ही आहे की भारतानं पॅरिस हवामानबदल कराराचं फक्त पालनच केलेलं नाही, तर हवामानबदलाच्या सुरक्षिततेसाठी निश्चित केलेल्या बांधिलकीत सुद्धा भारत जास्तीत जास्त योगदान देत आहे. तरीही मानव जातीला जागतिक पातळीवर आपल्या रीतीभाती बदलण्याची सक्त आवश्यकता आहे. त्यामुळेच भारतीय ज्ञान परंपरेकडे जगाची ओढ वाढत चालली आहे. अशी ज्ञान-परंपरा, जी वेद आणि उपनिषदांच्या रचनाकारांनी निर्माण केली आहे, रामायण आणि महाभारतात वर्णिलेली आहे, भगवान महावीर, भगवान बुद्ध आणि गुरू नानक यांच्या द्वारे जिचा प्रसार झाला आहे आणि महात्मा गांधीजींसारख्या महानुभावांच्या जीवनात जिचं मूर्त स्वरूप आढळतं.

गांधीजींनी सांगितलं होतं की निसर्गानुसार जगण्याची कला शिकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, पण एकदा का आपण नद्या, डोंगर, पर्वत, प्राणी, पक्षी यांच्या सोबत मैत्री केली की निसर्ग स्वत:ची रहस्यं आपल्यासमोर उघड करतो. चला, आपण संकल्प करूया कि गांधीजींचा हा संदेश आत्मसात करू आणि ज्या भारत भूमीत आपण राहतो तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रसंगी त्यागही करु. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये देशप्रेम आणि त्यागाची भावना अग्रक्रमानं होती. त्यांनी स्वता:च्या हितांची चिंता न करता प्रत्येक प्रकारच्या आव्हानांचा सामना केला. मी पाहिलय की कोरोनाच्या संकटाचा सामना करतानाही, लाखो लोकांनी स्वतःची पर्वा न करता, माणुसकीच्या दृष्टीनं निस्वार्थ भावनेनं दुसऱ्यांच्या आरोग्यरक्षणासाठी आणि इतरांचे जीव वाचवण्यासाठी मोठी जोखीम उचलली. अशा सर्व कोविड योद्ध्यांची मी मनापासून प्रशंसा करतो. अनेक कोविड योद्ध्यांना आपले प्राणही गमवावे लागले. मी त्या सर्वांच्या स्मृतींना वंदन करतो.

नुकतेच, कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं, मी लडाखमध्ये असलेल्या, कारगिल युद्ध स्मारक-द्रास इथं, आपल्या बहाद्दर जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी जाऊ इच्छित होतो. मात्र वाटेतच हवामान बिघडल्यामुळे माझं त्या स्मारकापर्यंत जाणं शक्य झालं नाही. वीर सैनिकांच्या सन्मानार्थ त्या दिवशी मी, बारामुल्ला इथल्या डॅगर वॉर मेमोरियल इथं हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. हे युद्ध स्मारक, आपल्या कर्तव्य पथावर सर्वोच्च बलिदान दिलेल्या सर्व सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलं आहे. त्या निडर योद्ध्यांचं शौर्य आणि त्यागाची प्रशंसा करत असताना माझ्या लक्षात आलं की त्या युद्ध स्मारकात एक आदर्श वाक्य कोरलेलं आहे- मेरा हर काम,देश के नाम. माझं प्रत्येक काम देशाच्या नावे. हे आदर्श वाक्य आपण सर्व देशवासियांनी, एक मंत्र म्हणून आत्मसात केलं पाहिजे आणि राष्ट्राच्या विकासासाठी संपूर्ण निष्ठा, तसच समर्पण भावनेनं काम केलं पाहिजे. माझी अशी इच्छा आहे की राष्ट्र आणि समाजाच्या हिताला अग्रक्रम देण्याच्या याच भावनेनं, आपण सर्व देशवासीयांनी एकजुटीनं भारताला प्रगतीपथावर पुढे न्यायला हवं.

मी विशेष करून भारतीय सशस्त्र दलांच्या शूर जवानांचं कौतुक करतो, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं आहे आणि गरज पडल्यावर हसतमुखानं बलिदानही दिलं आहे. मी सर्व प्रवासी भारतीयांची सुद्धा प्रशंसा करतो. त्यांनी ज्या देशांमध्ये आपलं घर वसवलं आहे, तिथे तिथे आपल्या मातृभूमीची प्रतिमा उंचावली आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अभिनंदन करतो. हा वर्धापन दिन साजरा करत असताना, साहजिकच माझ्या अंत:करणात, डोळ्यांसमोर, स्वातंत्र्याच्या २०४७ या शताब्दी वर्षातल्या, बलवान-समृद्ध आणि शांततापूर्ण भारताचं चित्रं तरळत आहे. मी सदिच्छा व्यक्त करतो की आपले सर्व देशबांधव कोविड महासाथीच्या या प्रकोपातून मुक्त होवोत आणि सुखं-समृद्धीच्या मार्गावर पुढे जात राहोत! एक वार, पुन्हा आपल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा ! धन्यवाद, जय हिंद!

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धरणगावच्या व्यापा-याची कोट्यवधींची फसवणूक; मनमाडच्या चार व्यापा-यांना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Next Post

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कामे अर्धवट सोडू नये, जाणून घ्या, बुधवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 9, 2025
Gyj9FwXXMAAG8KV
महत्त्वाच्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

सप्टेंबर 9, 2025
‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1
संमिश्र वार्ता

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

सप्टेंबर 9, 2025
IMG 20250909 WA0402 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्या उद्घाटन…केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, मंत्री भुजबळ, महाजन यांची विशेष उपस्थिती

सप्टेंबर 9, 2025
NMC Nashik 1
स्थानिक बातम्या

नाशिक महानगरपालिकेत प्रभाग रचनेवरील ९१ हरकतीवर सुनावणी संपन्न…

सप्टेंबर 9, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
संमिश्र वार्ता

नेपाळसारखी दुर्घटना कोणत्याही देशात घडू शकते! सावध राहा!…संजय राऊत यांचे ट्विट

सप्टेंबर 9, 2025
bhujbal 11
संमिश्र वार्ता

छगन भुजबळांची नाराजी कायम…मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले हे पत्र

सप्टेंबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

घर गहाण प्रकरणात दहा लाखाला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 9, 2025
Next Post
carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011