मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्विस कंपनी होलसिम ग्रुपची सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि एसीसी लिमिटेडची मालकी आता अदानी समूहाकडे असणार आहे. हा करार सुमारे १०.५ अब्ज डॉलरमध्ये झाला आहे. अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हा मोठा करार केला आहे.
अदानी समूहाने होलसिम समूहाचा भारतीय व्यवसाय ताब्यात घेण्याची बोली जिंकली आहे. आता अदानी समूहाकडे होलसिम ग्रुपच्या सिमेंट कंपनी- अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि एसीसी लिमिटेडचा व्यवसाय असेल. देशातील प्रसिद्ध सिमेंट ब्रँड अंबुजा आणि एसीसी विकत घेण्यासाठी दोन बड्या भारतीय व्यावसायिकांमध्ये शर्यत होती. अदानी समूहाव्यतिरिक्त सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू समूहही शर्यतीत होता. दुसरीकडे, अल्ट्राटेक सिमेंट तांत्रिक कारणांमुळे या शर्यतीत मागे पडल्याचे दिसून आले. होलसिम ग्रुप भारतात जवळपास १७ वर्षांपासून व्यवसाय करत आहे. या ग्रुपची ओळख भारतात प्रामुख्याने अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड अशी केली जाते. अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे.
अंबुजा सिमेंटचे बाजारमूल्य ७० हजार कोटींहून अधिक आहे. होलसिमची कंपनीत ६३.१९ टक्के हिस्सेदारी आहे, तर एसीसीचे बाजार भांडवल ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये स्विस कंपनीचा ५४.५३ टक्के हिस्सा आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी अदानी सिमेंट इंडस्ट्रीज या नावाने सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला. एसीसीवर मालकी मिळवल्यानंतर, अदानी सिमेंट क्षेत्रातील एक मोठे उद्योजक बनले आहेत. या करारावर प्रतिक्रिया देताना, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, “भारतातील होलसिम सिमेंट कंपन्यांना आमची ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिकशी जोडल्याने आम्ही जगातील सर्वात मोठी ग्रीन सिमेंट उत्पादन करणारे कंपनी बनू शकणार आहोत.”