मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमेरिकेची संशोधन संस्था हिंडेनबर्गने अदानी समूहातील मोठ्या हेराफेरीचा अहवाल समोर आणल्यानंतर शेअर बाजारात मोठी पडझड सुरू झाली आहे. दोन दिवसांमध्ये शेअर बाजार १,६४७ अंकांनी कोसळला आहे. परिणामी गुंतवणूकदारांचे तब्बल १०.७३ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
अदानी समूहाला मोठा फटका
अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये अक्षरशः त्सुनामी आल्याचे भासते आहे. समूहाच्या सर्वच कंपन्यांच्या समभागांमध्ये जवळपास २५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. दोनच दिवसांमध्ये समूहाची संपत्ती तब्बल ४.१७ लाख कोटींनी घटली आहे. शेअर बाजारातील व्यवहार आपल्याला वाटेल तसा फिरवणे आणि हिशोबाचा घोळ यावर बोट ठेवल्याने अदानी समूहाचे शेअर गडगडले आहेत. त्याचा फटका म्हणून शेअर बाजार कोसळला. अदानी समूहाचे समभाग कोसळण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या बँकांचे समभागही दणक्यात आपटले.
सेबी करणार चौकशी
अहवाल समोर आल्यानंतर आता बाजार नियामक सेबी सतर्क झाली असून, अहवालात विचारलेल्या ८६ प्रश्नांबाबत सखोल चौकशी करणार आहे. अदानी ग्रुपच्या अलीकडील व्यवहारांची काटेकोरपणे छाननी करण्याचे धोरण सेबीने अंगीकारले आहे. यामुळे जोपर्यंत अहवालावर योग्य उत्तर मिळत नाही तोपर्यंत समभाग घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
अदानी पोहोचले सातव्या स्थानी
या पडझडीनंतर फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी चौथ्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. २५ जानेवारीला त्यांची एकूण संपत्ती ९.२० लाख कोटी रुपये होती, ती शुक्रवारी ७.७६ लाख कोटींवर आली. जगातील प्रमुख श्रीमंतांच्या यादीतून नुकतेच अंबानीही बाहेर पडले आहेत.
कायदेशीर लढ्याची तयारी
हिंडेनबर्ग अहवाल आल्यानंतर अदानी समूहाला मोठा फटका सोसावा लागला आहे. यानंतर अदानी समूह हिंडेनबर्ग समूहावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचारात आहे. त्याचवेळी हिंडेनबर्गनेही कायदेशीर लढाईसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.
Adani Group BSE Share Market Panic SEBI Big Decision