मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या गंभीर आरोपांनंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये चांगलीच पडझड झाली. समूहाचे मार्केट कॅपीटल देखील चांगलेच कमी झाले आहे. त्यातच आता समूहाने त्यांच्या तीन महत्त्वाच्या कंपन्यांचे अतिरिक्त शेअर्स तारण ठेवल्याची माहिती समोर आली आहे. यावरून अदानी समूहाचे पाय खोलात असल्याचा निष्कर्ष अर्थ विषयातील तज्ज्ञांकडून काढण्यात आला आहे. पुढे येणाऱ्या माहिती नुसार, अदानी समूहाने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या तीन कंपन्यांचे शेअर्स गहाण ठेवले आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असा लौकिक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा अंग असलेल्या एसबीआय कॅप ट्रस्टी कंपनीकडे शेअर्स तारण ठेवले आहेत.
यासाठी ठेवावे लागले तारण
एसबीआयच्या प्रवक्त्याने निवेदनातून याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. त्यात एसबीआयने ऑस्ट्रेलियातील अदानी समूहाच्या कारमाइकल प्रकल्पासाठी 300 दशलक्ष डॉलर स्टँडबाय एलसी सुविधा विस्तारित केली आहे. याअंतर्गत तीन समूह कंपन्यांचे काही अतिरिक्त शेअर्स तारण ठेवण्यात आले आहेत. 140% च्या आवश्यक संपार्श्विक कव्हरेजचे प्रत्येक महिन्याच्या शेवटी पुनरावलोकन केले जाते आणि कोणतीही कमतरता टॉप अपद्वारे भरली जाते.
गेल्या वर्षी जून आणि जुलैमध्ये टॉप अप करण्यात आले होते आणि तिसरे टॉप अप 8 फेब्रुवारीला झाले होते. या प्रकल्पातील अदानी ग्रीनच्या तारण समभागांची संख्या 1.06 टक्के, अदानी पोर्ट्स 1.00 टक्के आणि अदानी ट्रान्समिशन 0.55 टक्के झाली आहे. ही केवळ अतिरिक्त संपार्श्विक सुरक्षा आहे आणि त्यासाठी कोणतेही वित्तपुरवठा करण्यात आलेला नसल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
‘हिंडेनबर्ग’चे आरोप
हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी रोजी अहवाल समोर आणत अदानी समूहावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यात शेअर्समध्ये छेडछाड केल्याचा दावा करण्यात आला. अदानी समूहाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. यानंतरही समूहाचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. या दणक्यामुळे शेअर्सची पडझड सुरू असल्याने अदानी एंटरप्रायझेसला बाजारात आणलेला एफपीओ परत घ्यावा लागला असून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे लागले आहेत.
Adani Group 3 Companies Pledged Shares