विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अब्जाधीश व्यावसायिक गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने (एजीईएल) नव्या उर्जा क्षेत्रात देशातील सर्वात मोठा खरेदी (अधिग्रहण) करार केला आहे. यासाठी तब्बल २५ हजार ५०० कोटी रुपये अदानींनी मोजले आहेत.
या करारा बाबत कंपनीने म्हटले आहे की, एसबी एनर्जी इंडियामधील सॉफ्टबँक ग्रुप (एसबीजी) आणि भारती ग्रुपच्या १०० टक्के समभागांचे अधिग्रहण करण्यासाठी त्यांनी शेअर खरेदी करार केला आहे. ३.५ अब्ज डॉलर्स (सुमारे २५ हजार ५०० कोटी) मध्ये होत आहे. अधिग्रहणानंतर, एजीईएलची एकूण नूतनीकरणक्षम उर्जा निर्मिती क्षमता २४.३ जीडब्ल्यू पर्यंत वाढली आहे.
एसबी एनर्जी इंडियामध्ये सॉफ्टबँक समूहाचे ८० टक्के आणि भारती समूहाचे २० टक्के हिस्सेदारी आहे. एसबी एनर्जीचे भारतातील चार राज्यांत ४ हजार ९५४ मेगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्प आहेत. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये इतर मालमत्तांपैकी ८४ टक्के सौर क्षमता (४,१८० मेगावॅट), नऊ टक्के पवन-सौर संकर क्षमता (४५० मेगावॅट) आणि सात टक्के पवन क्षमता (३२४ मेगावॅट) आहे. त्यापैकी १ हजार ४०० मेगावॅट सौर उर्जा प्रकल्प उत्पादन स्थितीत असून ३ हजार ५५४ मेगावॅट प्रकल्प निर्माणाधीन आहेत.
या सर्व प्रकल्पांसाठी एसबी एनर्जीचा पॉवर पर्चेस एग्रीमेंट (पीपीए) २५ वर्षांसाठी सौर ऊर्जा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसईसीआय), नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) आणि नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन (एनएचपीसी) आहे.
या नव्या कराराबाबत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, सदर अधिग्रहण मागील वर्षी जानेवारीत जाहीर झालेल्या नुसार एक पाऊल पुढे जात आहे, ज्या अंतर्गत २०२५ पर्यंत जगातील सर्वात मोठी सौर उर्जा कंपनी बनण्याची आमची योजना आहे.
सन २०३० पर्यंत जगातील सर्वात मोठी नवीन उर्जा कंपनी बनण्याचेही कंपनीचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर भारती एंटरप्रायजेसचे चेअरमन सुनील भारती म्हणाले की, हरित ऊर्जा क्षेत्रातील अदानी समूहाचा सर्वोत्कृष्ट विक्रम आहे. त्याचा अनुभव एसबी एनर्जीला नवीन दर्जा देईल.