इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेत झळकलेली अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा बुधवारी सकाळी कार अपघातात मृत्यू झाला. आणि तिचे चाहते हळहळले. एका अत्यंत गुणी अभिनेत्रीला गमावल्याची भावना सर्वांनीच व्यक्त केली. या अपघाताच्या वेळी तिच्यासोबत तिचा होणारा नवरा जय गांधी हा देखील होता.
प्रियकर सुदैवाने बचावला
वैभवीचा होणारा नवरा (प्रियकर) जय गांधी तिच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता. त्याच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या होत्या. या अपघातातून तो वाचला, मात्र, वैभवी तेवढी लकी ठरली नाही. वैभवी आणि जय सोमवारी हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेले होते.
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी आणि जय फॉर्च्युनर गाडीतून फिरायला निघाले होते. जय स्वतः गाडी चालवत होता. एका मोठ्या वळणावर त्यांनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊ दिले. मात्र, ट्रक पुढे जात असताना त्याचा गाडीला जोरदार धक्का लागला आणि वैभवी गाडीतून बाहेर पडून बाजूच्याच दरीत फेकली गेली. वैभवीचा जागीच मृत्यू झाला.
ट्रकने दिलेली धडक एवढी जोरदार होती की, गाडीही दरीत कोसळली. मात्र, वैभवीने सीट बेल्ट न लावल्याने तिचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. दरीत पडलेल्या वैभवीच्या डोक्याला दुखापत झाली आणि हृदयविकाराचा झटका आला. तर तिचा नवरा जयच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या. सुदैवाने तो या अपघातातून बचावला. त्याला उपचारासाठी बंजार रुग्णालयात पाठवण्यात आले.
अपघात झाल्यानंतर लगेचच आजूबाजूच्या काही लोकांनी वैभवीला बाहेर काढलं. परंतु, तोपर्यंत फार उशीर झाला होता. कार्डिअक अरेस्ट आणि डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे वैभवीचा मृत्यू झाला होता. वैभवीचा होणारा पती मात्र सुदैवाने या अपघातातून बचावला. या अपघातात त्याच्या हाताला दुखापत झाली आहे.
वैभवीची कारकीर्द
वैभवीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘सीआयडी’, ‘अदालत’ आणि ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. ‘साराभाई’तील जास्मीन या पात्राने तिला विशेष ओळख मिळवून दिली. गुजराती कलाविश्वात तिचं मोठं नाव होतं. वैभवीने ‘क्या कसूर है अमला का’ आणि ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ या डिजीटल सीरिजमध्येही काम केलं आहे.
Actress Vaibhavi Upadhyay Car Accident Update