इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात मध्यंतरी मी टू ची जोरदार चर्चा होती. अनेक प्रकरणे बाहेर पडू लागली, कास्टिंग काऊचचा अनुभव अनेक दिग्गज अभिनेत्रींना देखील आल्याचं नंतर उघडकीस आलं होतं. नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने फेक ऑडिशनच्या जाळ्यात ती कशाप्रकारे अडकली होती, याचा भयानक अनुभव सांगितला आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वातली अजून एक धक्का देणारी गोष्ट समोर आली आहे.
उर्मिला निंबाळकर असे या अभिनेत्रीचे नाव असून उर्मिलाने तिच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवरून या भयानक अनुभवाचा खुलासा केला आहे. अनेक वर्षे उर्मिला छोट्या तसेच मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अर्थात, हा तिचा स्वतःचा निर्णय होता. त्यानंतर तिने स्वतःचे युट्युब चॅनेल सुरू केले असून त्यावरून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओत तिने महिलांना सुरक्षेविषयी काही टिप्स दिल्या आहेत. याच टिप्स सांगताना तिनं तिच्याबरोबर घडलेला हा प्रसंग सांगितला. ती म्हणाली की, “मी आज माझ्या खासगी गोष्टी शेअर करणार आहे. मुंबईत एक प्रॉडक्शन हाऊस होतं. त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेले. एका मालिकेच्या ऑडिशनसाठी मी गेले होते. तिथे खूप गर्दी होती. बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांसाठी ऑडिशन सुरू होत्या. वेगवेगळ्या केबिन होत्या. मग मला तिथला निर्माता आतल्या खोलीत जाऊ या, असं म्हणाला.”
“त्यावेळेस मी वयाने खूप लहान होते. तरीही असं एकटीलाच आत बोलावणं योग्य नाही हे कळत होतं. बाहेर सगळी गडबड चालू होती. तरी सुद्धा मला का बरं आतल्या खोलीत बोलावलं असेल? इथे कॅमेरा आहे, इथे शूट आहे. मग माझ्याबरोबर असं काय बोलायचं आहे? त्यासाठी केबिन तर आहेच की? असे बरेच प्रश्न अंतर्मनात सुरू होते. मला काही कळलं नव्हतं. त्यानं मला गडबड करत आतल्या खोलीत जायचं आहे म्हणून घेऊन गेला. मी सुद्धा गेले. मुळात अशावेळी आपल्याला कळतंही नाही काय करायचं. तिथे गेल्यानंतर त्यानं अशा पद्धतीने सुरुवात केली की, मला तुला पर्सनली बघायचं आहे, तुला काय करता येतं. अभिनय काय करता येतो, आणखी काय काय करता येतं. त्यानंतर तो बोलता बोलता उठला. हा आता मिठी मारणार हे मला कळलं. माझ्या अंतर्मनाने दिलेले संकेत बरोबर होते.
उर्मिला सांगते, “मी जेव्हा त्या खोलीकडे जात होते, तेव्हाच हे काहीतरी भयानक आहे, हे मला जाणवलं होतं. तरीही मी गेले. नशीबाने खोलीचा दरवाजा उघडाच होता. त्यामुळे मी दरवाजाच्या बाजूलाच बसले होते. मला त्या खोलीत आतमध्ये जाऊन बसावं, असंही वाटतं नव्हतं. काहीतरी वेगळं वाटतं होतं. तो माणूस उठला आणि माझ्या जवळ येणार तितक्यात मी तिथून पळ काढला. माझ्यावर कोणताही बाका प्रसंग येण्याच्या आत मी माझी बॅग उचलली. आता इथे माझं काहीही राहील तरी चालेल हा विचार करून मी तिथून पळाले. सातवा किंवा आठवा मजला असेल. तेवढे मजले मी जोरदार पळाले, एका गर्दीच्या ठिकाणी गेले. तिथे एक सिग्नल होता. तिथल्या फुटपाथवर जाऊन बसले.”
“नंतर माझ्या कानावर आलं की, त्या माणसाला अटक झाली. ते प्रोडक्शन हाउस खोटं होतं. जो फ्लॅट होता, तो त्यांनी भाड्याने घेतला होता. तिथे सगळ्या फेक ऑडिशन होत्या. त्या माणसाने सगळ्यांना फसवलं होतं,” असा भयानक अनुभवाचा उर्मिलाने व्हिडीओत सांगितला. हा प्रसंग आपण कधीच विसरणार नाही, असंही ती म्हणाली.