मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कधीकधी सेलिब्रिटींमधले वाद फार मुद्दाम छेडले जातात की काय, अशी शंका यावी, एवढं त्याला ग्लॅमर मिळत असतं. असं म्हणतात की अँटी पब्लिसीटी इज अल्सो अ पब्लिसिटी. त्यानुसार भाजप नेत्या चित्रा वाघ सातत्याने उर्फी जावेद हिच्यावर टिका करत असतील, तर उर्फी तेच हवे आहे की काय, अशी शंका निर्माण होते.
छायाचित्रांवरून पेटलेला वादच अद्याप शमलेला नसताना उर्फी जावेदने आणखी एक ट्वीट करून चित्रा वाघ यांना चिथवण्याचा प्रयत्न केला आहे. तिने ‘मेरी डीपी इतनी ढांसू… चित्रा मेरी सासू’ असे ट्वीट करून सोशल मिडियाला नवं खाद्यं पुरवलं आहे. उर्फी जावेद हिला तिच्या ड्रेसिंग स्लाईलवरून चित्रा वाघ सातत्यानं धारेवर धरत असतात. भारतीय संस्कृतीत महिलेचं एवढं अश्लील रूप मान्य नाही, अशी भूमिका त्या घेत असतात. अलीकडेच तर त्यांनी उर्फी समोर आली तर तिला थोबाडीत लावेन, अशी रोखठोक भूमिका घेतली होती. त्यावरून पेटलेलं राजकारण, सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करून केलेली टिका हे सारं ताजं असतानाच आता नवा वाद सुरू झाला आहे. उर्फी जावेदला बेड्या घालेन, अशी धमकीही चित्रा वाघ यांनी दिली होती. एवढं प्रकरण पेटल्यानंतर उर्फी शांत बसेल, असे चित्रा वाघ यांना वाटले असावे. पण काहीही न करता सतत चर्चेत राहायला मिळत असेल तर ते तिला चालणारच आहे, असे दिसत आहे.
लवकरच मैत्रिणी होऊ चित्रू…
उर्फीचं हे ट्वीट आश्चर्य वाटून घेण्यासारखं मुळीच नाही. तिने यापूर्वीही आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रू… असं ट्वीट केलं होतं. एवढच नाही तर चित्रा वाघ यांनी आपली व आपल्या कुटुंबाची संपत्ती जाहीर केली तर आनंदाने तुरुंगात जायला तयार आहे, अशी भूमिकाही उर्फीने काही दिवसांपूर्वी जाहीरपणे घेतली होती.
पहिले डान्स बार बंद करा
माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली कल्पना आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय चालतो. डान्स बार सुरू आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी सुरू आहे. ते आधी थांबवा. त्याकडे लक्ष देण्यासाठी पुढाकार घ्या, असा सल्ला उर्फीने चित्रा वाघ यांना दिला होता.
Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
Actress Urfi Javed Slams BJP Leader Chitra Wagh