इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार हे झगमगाटापासून तसे थोडे लांबच असतात. यासह त्यांच्यात असलेला साधेपणा, भाबडेपणा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतो. खरं तर मराठी कलाकारांना त्यांच्या भूमिकांच्या नावानेच ओळखले जाते. ज्यांना आपण रोज टीव्हीवर पाहत असतो त्या पात्राच्या नावानेच त्यांची ओळख होते. यामुळेच अनेकदा त्यांचे खरे नाव कोणालाच माहित नसते. अशाच एका अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडेने आपल्या कौटुंबिक व्यवसायाविषयी माहिती दिली आहे. तितिक्षाने आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर करत त्यात स्टेशनरीचे, खेळण्यांचं दुकान दाखवलं आहे.
डोंबिवली पूर्वेकडील खुशबू नोव्हॅलेटीचे दृश्य या व्हिडिओत दिसते आहे. या व्हिडीओसह तितिक्षाने लिहिलेलं कॅप्शन सुद्धा नेटकऱ्यांना भावलं आहे. तितिक्षा म्हणते की, हे आमचे दुकान २५ वर्षांपासून आहे. आमच्या दुकानाला आम्ही क्वचित भेट देतो. पण प्रत्येक वेळी आम्ही इथे जातो तेव्हा करतो, आम्हाला आमच्या सध्या सुरु असलेल्या कामाचे पोस्टर दारात लावलेले आढळते. माझे बाबा कुठून हे फोटो मिळवतात हे माहित नाही. पण हो, हे माझ्या पालकांचे प्रेम आहे. आमच्या पालकांना आमचे यश साजरे करताना पाहणे हा आमच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण आहे. सदैव कृतज्ञ !”, असेही तितिक्षा सांगते.
मराठी मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून तितिक्षा झळकली होती. खरं तर या मालिकेत तितिक्षा सोबत तिची बहीण खुशबू देखील होती. तितिक्षा आणि खुशबू तावडे या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत. सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोंमधून त्यांच्यात असलेलं बाँण्डिंग दिसून येतं. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दुकानाचं नाव हे खुशबूच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. तर दारावर तितिक्षाच्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचा पोस्टर लावलेला आहे. तितिक्षा व खुशबू दोघींनी काही वर्षांपूवी स्वतःचा एक कॅफे सुद्धा सुरु केला आहे.
Actress Titiksha Tawade Famili Members Dombiwali Shop Video