मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
टॉपचे हिरो म्हणून सर्वांच्या गळ्याची ताईत बनलेले काकाजी म्हणजेच राजेश खन्ना यांचे नाव घेतले जाते. त्या काळात राजेश खन्ना यांच्यावर अनेक तरुणी जीव ओवाळून टाकत असत, असे म्हटले जाते. याचे अनेक किस्से आजही रंगवून सांगितले जातात. आज आपण राजेश खन्ना आणि अभिनेत्री टीना मुनीम यांची अधुरी प्रेम कहाणी जाणून घेणार आहोत.
बॉलीवूड चित्रपट क्षेत्रात सुपरस्टार सुपरस्टार ही संकल्पना गेल्या पन्नास वर्षापूर्वी अस्तित्वात आली, असे म्हटले जाते खरे म्हणजे राजकपूर, देव आनंद, दिलीप कुमार हे देखील सुपरस्टारच होते. परंतु त्यानंतर राजेश खन्ना यांना खऱ्या अर्थाने सुपरस्टार ही उपाधी तथा पदवी प्राप्त झाली. दरम्यानच्या काळात त्याही आधी किंवा नंतर अनेक अभिनेते सुपरस्टारच्या रांगेत होते. राजेश खन्ना या हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बंधन’ चित्रपटापासून सुरुवात करून ‘मर्यादा’ चित्रपटापर्यंत सलग १७ चित्रपट हिट झाले आणि यापैकी १५ चित्रपट सोलो हिट ठरले. हा करिष्मा यापूर्वी कधीच घडला नव्हता आणि आताही क्वचितच घडेल. विचार केला तर हा करिष्मा होऊनही ५० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण, हिंदी चित्रपटसृष्टीची आवड असणारा, राजेश खन्ना यांचे नाव सर्व रसिकांना माहित असेल. बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना जेवढे त्यांच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते, त्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची आणि अफेअरची जास्त चर्चा होते. त्यात टीना मुनीमचे नाव होते. एक काळ असा होता जेव्हा टीना राजेश खन्ना यांच्यावर खूप प्रेम करत होती. दोघेही लिव्ह इन मध्ये राहू लागले. विशेषतः टीनाने लग्नासारखी दीर्घ स्वप्नेही जपली होती. मात्र, टीना मुनीमने राजेश खन्ना यांच्याशी वचनबद्धतेमुळे ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता.
वास्तविक, राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला तेव्हा काकांनी टीना मुनीमला वचन दिले की, तो डिंपलला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करेल. टीना थांबली आणि वेळ निघून गेली. कधी काकांकडे ती त्याचा उल्लेख करायची तेव्हा ती गोष्ट टाळायची. राजेश खन्ना ना डिंपलला घटस्फोट देत होते आणि ना टीना मुनीमला स्पष्टपणे काही सांगत होते. दरम्यान, याचाच परिणाम टीनाने राजेश खन्नासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. राजेश खन्ना यांच्या चरित्रानुसार, टीनाच्या या निर्णयामुळे काका पूर्णपणे निराश झाले होते. त्यांनी टीनाला सर्व विनंत्या केल्या. त्यांच्यासमोर ओरडून विनंती केली. मात्र अभिनेत्रीने त्याचे ऐकले नाही आणि तेथून निघून गेली. राजेश खन्नाचे खरेच तुमच्यावर प्रेम होते का? असे शोभा डे यांनी टीनाला विचारले असता, त्यावर टीना टोमणे मारत म्हणाली की, काका फक्त स्वतःवर प्रेम करू शकतात. इतर कोणाशीही नाही. टीना मुनीमपासून विभक्त झाल्यानंतरही राजेश खन्ना यांनी डिंपलला घटस्फोटही दिला नव्हता. त्यानंतर दोघांच्या नात्यात कटुता आली. डिंपलही वेगळीच राहिली. पण कायदेशीररित्या ते कधीच वेगळे झाले नाहीत. टीना मुनीमचे नाव नंतर संजय दत्तसोबतही जोडले गेले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. नंतर सन 1986 मध्ये टीना ही अनिल अंबानींना भेटली. दोघे एका कार्यक्रमात पहिल्यांदा भेटले होते, जिथे टीनाला पाहून अनिल तिच्या प्रेमात पडला. हळूहळू दोघे जवळ आले आणि 1991 मध्ये त्यांनी लग्न केले.