इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मिस युनिव्हर्स झालेली अभिनेत्री सुश्मिता सेन हिला काही तासांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली. अँजिओप्लास्टीही करण्यात आल्याचं सुश्मिताने पोस्टमध्ये म्हटलं आहे. वडिलांबरोबरचा हसरा फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या आरोग्याबाबत माहिती दिली. वयाच्या पन्नाशीकडे झुकणाऱ्या तरीही फिटनेसकडे विशेष लक्ष देणाऱ्या सुश्मिताला हृदविकाराचा झटका आल्याने तिच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत ती लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगितले आहे.
सुश्मिताला याआधीही गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे ती या क्षेत्रापासून तब्बल चार वर्ष दूर राहावं लागलं होतं. सुश्मिताने एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला होता. “मी एका बंगाली चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. शूटिंगदरम्यान मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध झाले. त्यानंतर मला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा मला एडिसन नावाचा आजार झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या आजारामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स बनवण्याची प्रक्रिया थांबते. या आजाराचा किडनीवर गंभीर परिणाम होतो. शरीराला आवश्यक असलेले हार्मोन्स कमी प्रमाणात निर्माण होतात, असं सुश्मिता म्हणाली होती.
“मी खूप आजारी होते. मला दर आठ तासाला औषध घ्यावी लागत होती. या औषधांमुळे माझं वजन झपाट्याने वाढत होतं. डोळ्यांना सूज आली होती. औषधांमुळे केसही खूप गळत होते. मिस युनिव्हर्स आणि एक अभिनेत्री असल्यामुळे मला कायम तंदुरुस्त राहणे गरजेचं होतं. या सगळ्यामुळे मला टेन्शन यायचं. माझ्या दोन मुलींचा सांभाळ कशी करू? ही चिंता मला सतावत असायची, असंही सुश्मिता म्हणाली. सुश्मिताने या आजाराचा सामना कसा केला, याबाबतही मुलाखतीत भाष्य केलं. ती म्हणाली, “मला मानसिक तणावाला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे मी ध्यानधारणा केली. या आजारातूनही मी पूर्णपणे बरे झाले. २०१९ नंतर आता मला कोणताही त्रास होत नाही”.
Actress Sushmita Sen Suffered Serious Disease