इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणतीही भूमिका अगदी लीलया पेलून, भूमिका विनोदी असो वा गंभीर किंवा नकारात्मक प्रत्येक भूमिकेत जीव ओतून ती भूमिका जिवंत करण्याचे कलावंताचे कसब वाखाणण्याजोगेच. अशीच एक गुणी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. आज जरी ती यशस्वी दिसत असली तरी तिच्या आयुष्यात एक काळ असा होता की, तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. अगदी दुसऱ्याच्या घरची धुणीभांडी देखील करावी लागली.
विनोदाचे कमाल टायमिंग
आज वयाच्या पन्नाशीत असलेल्या सुप्रिया पाठारे या कधी मध्यवर्ती भूमिकेत दिसल्या नसल्या, तरी सहाय्यक अभिनेत्री म्ह्णून त्या चांगल्याच चर्चेत असतात. त्यांचे विनोदाचे टायमिंगही अचूक आहे. यामुळेच ‘फू बाई फू’मधील त्यांच्या कामाची चांगली चर्चा झाली होती. ‘फू बाई फू’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘पुढचं पाऊल’ सारख्या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुप्रिया पाठारे एकेकाळी लोकांच्या घरची भांडी घासायला जायच्या. विशेष म्हणजे
सुप्रिया पाठारे यांची लहान बहिण ही देखील अभिनेत्री, अर्चना नेवरेकर. अर्चना नाटकात काम करायच्या आणि सुप्रिया त्यांच्यासोबत म्हणून जायच्या. या सोबतीचे अर्चना सुप्रिया यांना १०० रुपये द्यायच्या.
नाचाची आवड पूर्ण करण्यासाठी
खरं तर सुप्रियांना नाचाची आवड होती. अर्चना पालेकर यांच्याकडे त्यांना भरतनाट्यम शिकायचं होतं. त्यासाठी त्यांनी मैत्रिणीकडे भांडी घासायचं काम देखील स्वीकारलं. या कामाचे त्यांना १०० रुपये मिळायचे. त्यातून त्या भरतनाट्यमच्या क्लासची ७० रुपये फि भरायच्या. ही फी देऊन उरलेले पैसे घरी आईला द्यायच्या. तेव्हा सुप्रिया आईबरोबर जवळपास १८ घरात जाऊन भांडी घासायची काम करायच्या. चार भावंडांमध्ये सुप्रिया सर्वात मोठ्या. घरचा आर्थिक भार पेलावा यासाठी त्या भांडी घासायच्या कामाबरोबरच कधी रस्त्यावर अंडी विकणं, चणे विकायला जाणं, दुधाच्या बाटल्या घरोघरी नेऊन देणं अशी काम देखील करायच्या.