इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील काही सेलेब्रिटी आपल्या भावना नेहमीच परखडपणे मांडत असतात. आपल्या भूमिकांवरही ते नेहमीच ठाम असतात. अशीच स्वतःची ठाम भूमिका असलेली अभिनेत्री म्हणजे सो कूल अर्थात सोनाली कुलकर्णी. मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख करणारी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. सोनालीने मराठी प्रेक्षकांसोबतच देशभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सोनाली कुलकर्णीने नुकतीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
अंधश्रद्धेविरोधात लढा उभारण्यामध्ये मोठं योगदान आलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एक प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली. त्याचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोबरोबर तिने एक पोस्टही लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
सोनाली लिहिते, ”आज डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा जन्मदिवस. अलका धुपकर या माझ्या अत्यंत आवडत्या मैत्रिणीने पत्रकारितेच्या पुढे जाऊन स्वतःला भेडसावणाऱ्या अनेक मुद्दयांवर आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्यावर सकारात्मक पर्याय शोधला आहे. तिने आपल्या अशाच कळकळ वाटणाऱ्या सहकाऱ्यांबरोबर नरेंद्रकाकांविषयी मुंबईत एक प्रदर्शन भरवलं आहे, चव्हाण सेंटरमध्ये. अनेक तरूण कलाकरांनी विलक्षण कलाकृती घडवल्या आहेत. त्यातले बहुतांश नरेंद्रकाकांना भेटलेही नाहीत. पण नरेंद्रकाकांचे विचार त्यांच्यात झिरपले आहेत. आपल्या सुंद मनांना जागं करणारा भला माणूस होता तो. पण आपल्यातल्याच काही भेकड लोकांनी त्यांचा निर्दयपणे खून केला!
पुढे तिने लिहिले आहे की, रागाचं पर्यवसान समोरच्या माणसाच्या हत्येत होणार असेल तर रोज आपल्याला ढीगाने मृतदेह बघायला मिळतील आणि हताश होण्यापलीकडे हातात काहीच उरणार नाही. हे प्रदर्शन नक्की पहा. धर्म, देव ह्याच्या विरोधात कधीच नव्हती अंनिस. संपूर्ण माहिती वाचताना मनातला संताप आणि आक्रोश आवरून नरेंदकाकांचे आभार मानावेसे वाटतात आणि वचनाचा पुनरूच्चार. आम्ही सारे दाभोलकर. देवावर किंवा आपापल्या श्रध्दास्थानावर विश्वास ठेवणं हा आपला कायदेशीर हक्क आहे. त्यावर कोणी का हरकत घेईल. पण आर्थिक/शारिरिक/मानसिक/लैंगिक शोषण आणि पिळवणूक थांबवणं नक्कीच आपल्या हातात आहे, विचारात आहे”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दल लिहिलेल्या या पोस्टवर अनेकजण आपले मत व्यक्त करत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी त्यावर खूप छान, फारच मस्त, किती सुंदर अशा कमेंट केल्या आहेत. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/SonaliKulkarni.org/posts/707152097442220
Actress Sonali Kulkarni Post on Narendra Dabholkar