इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनाच्या काळात सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स यांची मनोरंजनाची साधनं म्हणून नव्याने ओळख झाली. आणि आता तर ओटीटीचे महत्त्व आणि लोकप्रियता इतकी वाढली आहे की, अनेक मोठे कलाकार वेबसिरीजमध्ये पदार्पण करताना दिसतात. काजोल, करिना कपूर या देखील या वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील लवकरच एका वेब सिरीजच्या माध्यमातून ओटीटीवर झळकणार आहे.
बॉलीवूडमधील ‘दबंग गर्ल’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चित्रपटांची नेहमीच चर्चा असते. तिच्या अभिनयाची वाहवा होते. ‘दबंग’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटात ती झळकली. आता सोनाक्षी लवकरच ओटीटी माध्यमावर झळकणार आहे. ‘दहाड ‘नावाच्या वेबसिरीजमध्ये ती दिसणार आहे. विशेष म्हणजे भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी ही वेबसीरिज एका फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली जाणार आहे.
२०१६ मध्ये आलेल्या ‘अकीरा’ या चित्रपटातील सोनाक्षीच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले होते. आता तिची ‘दहाड’ ही आठ भागांची क्राईम ड्रामा वेबसीरिज येत आहे. यात सोनाक्षी सिन्हा एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. इन्स्पेक्टर अंजली भाटी असे तिच्या भूमिकेचे नाव आहे. या मालिकेत राजस्थानमधील एका छोट्या शहराची कथा दाखवण्यात आली आहे. या शहरातील सार्वजनिक शौचालयात अनेक महिलांचा गूढ मृत्यू होतो. आणि हे केस अंजलीकड येते. अंजलीला सुरुवातीला हे मृत्यू आत्महत्या वाटतात, पण जसजसे प्रकरण पुढे सरकत जाते तसतसे अंजलीला त्यामागील सिरीयल किलरची जाणीव होते. यानंतर पोलीस आणि मारेकरी यांच्यात एक खेळ सुरू होतो.
सोनाक्षीची ही वेबसीरिज ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, वेबसिरीज प्रदर्शित होण्यापूर्वी बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तिचा प्रीमियर होणार अशी चर्चा आहे. आजवर अनेक चित्रपट बाहेरच्या फिल्म फेस्टिवलमध्ये गेले आहेत मात्र ‘दहाड’ ही पहिली भारतीय वेबसीरिज असेल, जी परदेशात दाखवली जाणार आहे. सोनाक्षी व्यतिरिक्त या वेबसिरीजमध्ये विजय वर्मा आणि गुलशन देवय्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याचे दिग्दर्शन रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय यांनी केले आहे, तर एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी यांची ही निर्मिती आहे.
Actress Sonakshi Sinha Webseries Entry