मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या एका फोटोने सोशल मीडियात खळबळ उडवून दिली आहे. सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने कोणाचा तरी हात धरलेला आहे. सोनाक्षीने हाताच्या बोटात सुंदर अंगठी घातली आहे. विशेष म्हणजे ही साखरपुड्याचीच अंगठी असल्याचे बोलले जात आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘माझ्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे. माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे… आणि ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही.’
सोनाक्षी सिन्हाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘विश्वास बसत नाही की हे सोपे होते.’ सोनाक्षीच्या या पोस्टनंतर ती कदाचित लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिच्या बोटातील अंगठी पाहून तिने एंगेजमेंट केल्याचे समजते. तिच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. सोनाक्षीच्या या पोस्टवर अनन्या बिर्लाने लिहिले की, ‘हू..’. फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, ‘शुभेच्छा सोनाक्षी तुझ्यावर खूप प्रेम करते.’ लाखो चाहत्यांनी तिच्या पोस्टला लाईक केले आहे. अनेक चाहते तिला शुभेच्छाही देत आहेत. मात्र, विशेष म्हणजे, तिने कुणाबरोबर एंगेजमेंट केली आहे ते सोनाक्षीने उघड केलेले नाही.
व्हायरल भयानीनेही हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले – लग्न झाले? अनेक चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले – कोणासोबत? सलमान खान काय! आणखी एका यूजरने लिहिले – आता सलमान खानसोबत असे बोलू नका. एका व्यक्तीने लिहिले – मला कळत नाही की हा पब्लिसिटी स्टंट का आहे.
दरम्यान, दबंग चित्रपटापासूनच सोनाक्षीचे नाव सलमान खानसोबत जोडले गेले आहे. अधून मधून त्याची जोरदार चर्चा होत असते.









