इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदी मनोरंजन विश्वाच्या तुलनेत मराठीत नाती टिकण्याचे प्रमाण अधिक आहे. रमेश देव आणि सीमा देव हे त्याचं उत्तम उदाहरण. आता आतापर्यंत अगदी अशोक सराफ – निवेदिता सराफ, अविनाश नारकर – ऐश्वर्या नारकर यांचं नाव घेतलं जातं. याच पंक्तीत आता अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचा समावेश झाला आहे. नुकतीच या दोघांनी लग्नगाठ बांधली. पण त्यातही चर्चा ही शिवानी आणि तिची सासू अर्थात लाडकी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचं कसं गुळपीठ आहे, याचीच होती.
अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय कपल म्हणून ओळखलं जातं. नुकतीच या दोघांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानी हे कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. विराजसची आई मृणाल कुलकर्णी यांचाही शिवानीवर जीव आहे. या दोघींमध्ये सासू-सुनेपेक्षा मैत्रिणींचे नाते आहे. विशेष म्हणजे शिवानी ही तिच्या सासूबाईंना सासू किंवा आई या नावाने नव्हे तर चक्क ‘ताई’ या नावाने हाक मारते. नुकतंच एका मुलाखतीत तिने याबद्दलचा खुलासा केला आहे.
शिवानी ही लवकरच झी मराठी वाहिनीवरील एका नव्या मालिकेत झळकणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ असे या मालिकेचे नाव आहे. ही मालिका लवकरच प्रसारित होणार असून नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत शिवानी ही अक्षरा ही भूमिका साकारताना दिसत आहे. लग्नानंतर शिवानीची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या निमित्ताने शिवानीने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत शिवानीला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि सासूबाईंबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
यावेळी शिवानी म्हणाली, “मी आणि विराजस कॉलेजपासूनच चांगले मित्र आहोत. अनेक नाटकात आम्ही एकत्र काम केलं आहे. आम्ही सतत एकमेकांबरोबर राहत असल्याने लोकांनी आम्हाला कपल म्हणून हाक मारण्यास सुरुवात केली. विराजसची आई म्हणजे मृणाल कुलकर्णी यांना आधीपासूनच आपली सून कोण होणार आहे? हे माहिती होते.
“विराजस हा शिवानीला घेऊन कायम घरी यायचा. हा दरवेळी शिवानीलाच घरी का आणतो, असा प्रश्न त्यावेळी मृणाल कुलकर्णींना पडलेला असायचा. मी आणि मृणाल कुलकर्णी यांनीही अनेक प्रोजेक्टसमध्ये एकत्र काम केलं आहे. मी मात्र त्यांना सेटवर ताई असा आवाज द्यायची. याच नावाने मी त्यांना हाक देखील मारायचे.” एका चित्रपटात मृणाल कुलकर्णींनी शिवानीच्या आईची भूमिका साकारली होती. त्यावेळी सेटवर सर्वजण त्यांना ताई म्हणून हाक मारायचे. नाटकादरम्यान काम करतानाही ताई हे अंगवळणी पडलं होतं.
विराजसशी लग्न झाल्यानंतर मी त्यांना काय हाक मारु, असा प्रश्न मला पडला होता. त्यावेळी अनेकदा मी गप्प बसायचे. शिवानीची हा अडचण आधीच मृणाल कुलकर्णी यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तू मला ताई म्हण, मला त्याचं काहीच वाटणार नाही, असं सांगितलं. यामुळेच मी आजही मृणाल कुलकर्णी यांना ताई म्हणूनच हाक मारते. हे ऐकल्यावर अनेकांना वेगळ वाटतं”, असे शिवानीने म्हटलं.