मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती व उद्योजक राज कुंद्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे. अश्लील चित्रपट बनविण्याबरोबरच ते चित्रपट काही अॅप्सवर प्रसारितही करत असल्याने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक केली असून या प्रकरणी माहीती देताना म्हटले की, अश्लील चित्रपट बनविल्याबद्दल आणि काही अॅप्सवर दाखविल्याबद्दल फेब्रुवारी मध्ये गुन्हे शाखेने मुंबईत गुन्हा दाखल केला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, राज कुंद्रा हा मुख्य सूत्रधार असल्याचा दाट संशय येत असल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. आमच्याकडे यासंदर्भात पुरेसे पुरावे आहेत आणि या प्रकरणात अद्याप चौकशी चालू आहे.
शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यापूर्वीही बर्याच वेळा वादात सापडले आहेत. यापूर्वी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे यांनी त्याच्याविरूद्ध आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. राज कुंद्राच्या कंपनीने तिच्या छायाचित्रांचा गैरवापर केल्याचा आरोप पूनम यांनी केला होता. तथापि, राज कुंद्रा यांनी या प्रकरणी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते आणि असे म्हटले होते की, त्याला या प्रकरणाशी काही देणे-घेणे नाही. तसेच त्यांनी असे देखील म्हटले होते की, ज्या कंपनीने अश्लील व्हिडिओ बनविल्याचा आरोप आहे, त्या कंपनीसोबतच त्याचा काहीही संबंध नसून त्याने त्या कंपनीचे काम सोडले आहे.