इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळातील स्त्री ही स्वावलंबी आहे. पूर्वीच्या काळी महिला कुठे आहेत, असा प्रश्न विचारला जात असे. पण आज ती कुठे नाही असा प्रश्न पडतो. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज “ती” ने प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. पुरुषांची मक्तेदारी मोडीत तिने अनेक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यामुळेच ५० टक्केच आरक्षण स्त्रियांना आहे. म्हणूनच खास ‘फक्त महिलांसाठी’ या चित्रपटाची घोषणा निर्माता – दिग्दर्शक पारितोष पेंटरकडून नुकतीच करण्यात आली.
या चित्रपटाच्या माध्यमातून मृणाल कुलकर्णी ८ वर्षांनी दिग्दर्शिका म्हणून काम करताना प्रेक्षकांना दिसणार आहेत. त्यांचा मुलगा विराजस या चित्रपटाचा लेखक आहे. या सगळ्या गोष्टींमुळे प्रेक्षक खुश झालेले दिसत आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटामुळे वेगळा वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री शिल्पा नवलकर यांच्या ‘सेल्फी’ या नाटकाच्या कथेत थाडेफार फेरफार करून ‘फक्त महिलांसाठी’ या चित्रपटाची कथा लिहिली गेली आहे, अशी पोस्ट शिल्पा नवलकर यांनी सोशल मीडियावर टाकली आहे.
अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टमध्ये आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, २०१५ मध्ये मी लिहिलेलं ‘सेल्फी’ हे मराठी नाटक रंगभूमीवर आलं. परितोष पेंटर या निर्मात्याने ते हिंदी आणि इंग्रजी ह्या दोन भाषांमध्ये सादर केलं. त्यावेळेस निर्माता म्हणून मला त्याचा उत्तम अनुभव आला. त्याच वेळेस त्याने मला सांगितलं होतं की त्याला ‘सेल्फी’ या नाटकावर चित्रपट करण्याची इच्छा आहे. पण हा फिल्मचा विषय नाही असे म्हणून मी त्याला चित्रपट तयार करण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी म्हणजे जून २०२२ मध्ये मला पुन्हा परितोषचा फोन आला आणि मला भेटून त्याने मला पुन्हा ‘सेल्फी’ ह्या नाटकावर सिनेमा करण्याची आपली इच्छा असल्याचे सांगितले. मी पुन्हा तेच उत्तर दिलं. पण तो ह्याच वर्षी ‘सेल्फी’ वरचा चित्रपट करण्याबद्दल ठाम होता.
अखेर मी त्याला त्या चित्रपटाची पटकथा लिहिण्यास होकार दिला. मी त्याला सांगितलं की, आपल्याला नाटकाचा गाभा तोच ठेवून सिनेमासाठी वेगळी कथा बांधावी लागेल. आमचं दोघांचं बोलणं झाल्यानंतर दिग्दर्शक म्हणून मृणाल कुलकर्णीची निवड झाली. सहलेखकासाठी मी स्वतः विराजस कुलकर्णीचं नाव सुचवलं. तिसरी मीटिंग झाल्यानंतर कथा बांधायला सुरुवात करायची असं ठरलं. “पुढच्या आठवड्यात भेटूया” ह्या वाक्यानंतर मला परितोष पेंटर कडून एकही फोन आला नाही. दोन दिवसांपूर्वी मला थेट परितोष पेंटर निर्मित मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित विराजस कुलकर्णी लिखित ‘फक्त महिलांसाठी पीएमएस’ नावाची फिल्म अनाउन्स झालेली दिसली. पाच वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या महिला एका ट्रेन प्रवासासाठी भेटतात, एका अशा जागी अडकून पडतात जिथून त्यांना चटकन बाहेर पडता येत नाही आणि त्यानंतर त्यांचा एकत्र होणारा आंतरिक प्रवास हा ‘सेल्फी’ नाटकाचा मूळ गाभा आहे. मृणालने काल दिलेल्या एका मुलाखतीत तिने चित्रपटाचा हाच गाभा सांगितला.
हे सगळं समजल्यानंतर त्यांनी पारितोष यांच्याशी संपर्क साधला. त्या संभाषणाबद्दल शिल्पा नवलकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “मी परितोष पेंटरशी या संदर्भात बोलले. त्याने अर्थातच मला सांगितलं की आता कथा वेगळी असल्यामुळे मला पुढे काहीही कळवण्याची त्यांना गरज वाटली नाही.. तो कामाच्या गडबडीत असल्यामुळे मला फोन करून कळवायचंही राहून गेलं की, आता विराजसच ती फिल्म लिहिणार आहे.”
पुढे त्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या, “त्याने मूळ नाटकाच्या लेखकाला कुठल्याही प्रकारचे क्रेडिट देणं किंवा हक्क विकत घेण्याचा विचार केला नाहीये. आता कथा वेगळी असली तरीही हा चित्रपट माझ्याबरोबर सुरू केला होता, त्यामुळे तो ‘सेल्फी’वरचाच आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. ज्या निर्मात्याने माझं ‘सेल्फी’ हे मराठी नाटक प्रचंड आवडलं म्हणून इंग्रजी आणि हिंदीमध्ये त्याची निर्मिती केली, तो जेव्हा हीच कल्पना घेऊन चित्रपट करतो, तेव्हा विराजस कुलकर्णी याची ही मूळ संकल्पना आहे ह्यावर विश्वास कसा ठेवायचा? शिल्पा नवलकर यांच्या या पोस्टला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत पाठिंबा दर्शवला आहे.
Actress Shilpa Navalkar Allegation New Marathi Film Story
Entertainment Marathi Movie
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/