इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सई ताम्हणकर ही मराठीतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बोल्ड, ब्युटीफुल आणि बिनधास्त असं तिचं वर्णन नेहमीच केलं जातं. अनेक गोष्टींसाठी सई नेहमीच चर्चेत असते. तिच्या करिअरने सध्या चांगलाच वेग घेतला आहे.
घटस्फोट घेतल्याच्या दिवशीच केली पार्टी
२०१३ मध्ये सईने अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. अमेय हा देखील सिनेक्षेत्राशीच निगडित आहे. मात्र, अवघ्या दोनच वर्षात या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सई सांगते, ‘ज्या दिवशी आम्ही दोघांनीही कोर्टामध्ये जाऊन सही केली त्याचदिवशी आम्ही पार्टी केली. आम्ही मित्र-मंडळींना पार्टीसाठी बोलावलं. आमच्या घटस्फोटाबाबत सांगितलं. रात्रभर आम्ही मद्यपान केलं आणि धम्माल केली. आमच्या नात्यामध्ये समजूतदारपणा होता. त्याच्या नावाचं टॅटूही मी आजही ठेवले आहे.
आयुष्यात एक वेळ अशी येते की जे तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही करता. त्याच्यासोबतच्या अनेक चांगल्या आठवणी माझ्याकडे आहेत, त्या मी पुसून का टाकायच्या? म्हणूनही आजही ते टॅटू मी मिरवते.’ अमेय नेहमीच माझ्या आयुष्यातील स्पेशल व्यक्ती असेल कारण तो खरंच खूप चांगला आहे.
नवीन काय?
सईच्या भूमिका, तिचे नवे सिनेमे याकडे जसे तिच्या चाहत्यांचे लक्ष असते तसेच तिच्या व्यक्तिगत आयुष्यात काय चाललय हे जाणून घेण्यासाठीही तिचे चाहते आतूर असतात. आता सई अनिश जोगळेकरसह रिलेशनशिपमध्ये आहे. अनिश सोबत फोटो पोस्ट करुन ‘दौलतराव सापडला’ असं तिने कॅप्शन दिलं होतं. अनिश हा सिनेनिर्माता आहे. गर्लफ्रेंड, मुरांबा, वायझेड आणि टाईमप्लीज अशा काही सिनेमांची निर्मिती त्याने केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
गेल्या वर्षीच तिच्या ‘मिमी’ या सिनेमातील भूमिकेसाठी तिला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सई मराठी सिनेमातही तितकीच सक्रिय आहे. ‘पॉंडिचेरी’ या सिनेमात तिने उत्तम भूमिका साकारली. तसंच भाडिपाच्या ‘बेरोजगार’ या सिरीजमध्येही तिने भूमिका साकारली.
Actress Sai Tamhankar on Divorce and Night party